
नायगाव : बाळासाहेब पांडे
“शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी तसेच शाळांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांनी नियोजनबद्ध कार्यक्रमांची आखणी करावी,” असे आवाहन नायगाव पंचायत समितीचे नूतन गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड यांनी केले.
आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्हा परिषद कन्या शाळेच्या सभागृहात बुधवारी सकाळी अकरा वाजता ही बैठक पार पडली. बैठकीचे नियोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आल्याने तालुक्यातील मुख्याध्यापकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
बैठकीत शाळा प्रवेशोत्सवाचे प्रभावी नियोजन, युडायस प्लस माहिती अद्ययावत करणे, विद्यार्थ्यांचे पुढील वर्गात प्रवेश, आधार क्रमांक पडताळणी, पाठ्यपुस्तक वितरण तसेच शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी यासह विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत सर्व केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांचे पुढील वर्गात प्रवेश आणि आधार क्रमांक पडताळणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी शाळा व परिसर स्वच्छता, शंभर टक्के पालकांची उपस्थिती तसेच लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले.
शालेय गणवेशाच्या गुणवत्तेबाबत शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले. तसेच युडायस प्लसमधील विद्यार्थी संख्येच्या आधारे पाठ्यपुस्तक वितरणाचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी शाळा दत्तक घेऊन शैक्षणिक विकासाला चालना देण्याचे आवाहन करण्यात आले.
शाळा व परिसर स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रंगरंगोटी, वर्गखोल्यांची दुरुस्ती, विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष तसेच इतर भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी विविध निधींचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला.
दर्शनवाड यांच्या प्रभावी वक्तव्याने शिक्षण क्षेत्रात आनंदाचे उधाण
पहिल्याच बैठकीत गट शिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड यांनी काम हेच आपले कर्तव्य असून दाम देऊन काम करून देणाऱ्यास व घेनाऱ्याना सज्जड दम बैठकीत दिल्याने दर्शनवाड यांच्या वक्तव्याची बैठकीत व बैठक संपल्या नंतर चर्चा होत होती.
शाळांच्या विकासासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा पाठपुरावा करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
‘निपुण महाराष्ट्र’ अभियानांतर्गत जून ते सप्टेंबर या कालावधीत लेखन-वाचन उपक्रम प्रभावीपणे राबविणे, राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण, देशभक्तीपर गीतांवरील सामूहिक कवायती, योग प्रशिक्षण तसेच शैक्षणिक पर्यटन उपक्रमांचे नियोजन करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय बोगस शाळांविरोधात जनजागृती मोहीम राबविणे, शाळा व्यवस्थापन समित्यांच्या कामकाजाचा नियमित आढावा घेणे, शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया, शिक्षक पात्रता परीक्षा व केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांची माहिती सादर करणे, “एक झाड आईच्या नावाने” उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे आदी विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
या वेळी आपला यवतमाळ जिल्ह्यातील अनुभव व उमरखेड येथे राबवलेल्या उपक्रमाची माहिती नायगाव तालुक्याला यावा यासाठी उमरखेड तालुक्यात नोकरी करणारे व मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मानित शिक्षक तथा नरसी तालुका नायगाव येथीलव्राहिवासी श्रीनिवास नरवाडे यांना मुद्दामून पाचारण करून त्यांचे मार्गदर्शन व अनुभव या बैठकीतून देण्यात आले.
या बैठकीस ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पंडितराव ढगे, व्यंकटराव जाधव, उद्धवराव ढगे, कपिलेश्वर नलबलवार, मंगेश हनवटे यांच्यासह तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक बोरगावे, ठिकाणे, पांचाळ, नरपडवार ,पांडे सर व जिल्हा परिषद प्रा.शाळेचे मुख्याध्यापक, आदी उपस्थित होते.उद्धव ढगे सर,जाधव सर,श्याम कांबळे, आदिने विचार व्यक्त केले ,संचलन नलबलवार सर यांनी तर आभार बुद्धपा सर यांनी मानले.



