ताज्या बातम्यानांदेडनायगाव

नायगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अमोल भगत रुजू.

व्हॉईस ऑफ मिडियातर्फे स्वागत; वाहतूक कोंडी, अवैध धंदे व कायदा-सुव्यवस्थेबाबत पत्रकार शिष्टमंडळाशी चर्चा.

नायगाव : बाळासाहेब पांडे

नायगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी अमोल भगत यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, त्यांच्या रुजू झाल्यानंतर व्हॉईस ऑफ मिडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने नायगाव शहरासमोरील विविध समस्या आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

यापूर्वी पोलीस निरीक्षक अमोल भगत हे हिमायतनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. नायगावसारख्या वेगाने विस्तारत असलेल्या शहरात वाहतूक नियंत्रण, अवैध धंद्यांवर अंकुश आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे ही मोठी जबाबदारी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

पत्रकार शिष्टमंडळाने नायगाव शहरातील नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावरील डॉ. हेडगेवार चौकात निर्माण होणारी वाहतूक कोंडी हा गंभीर प्रश्न पोलीस निरीक्षक भगत यांच्या निदर्शनास आणून दिला. तसेच शेळगाव रोडवरील सुरू असलेल्या विकासकामांमुळे शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना वाहतुकीच्या दृष्टीने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, याकडेही त्यांचे लक्ष वेधण्यात आले. या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सूचना देऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रभावी नियोजन करणे गरजेचे असल्याची अपेक्षा पत्रकारांनी व्यक्त केली.

याशिवाय शहरात वाढत असलेली बेशिस्त वाहतूक, अवैध धंद्यांचे संभाव्य आव्हान आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याची चर्चा यावेळी करण्यात आली. शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांवर येणारा ताण लक्षात घेऊन नागरिकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत उपस्थितांनी मांडले.

दरम्यान, पोलीस विभागात काही नवीन कर्मचारी रुजू होत असून स्वतःही नव्याने जबाबदारी स्वीकारत असल्याने सुरुवातीच्या काळात काही प्रशासकीय अडचणी येऊ शकतात, अशी बाबही चर्चेदरम्यान पुढे आली. मात्र, नागरिकांच्या सहकार्याने या अडचणींवर मात करून नायगावमध्ये प्रभावी पोलिसिंग राबविण्यास प्राधान्य देण्यात येईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी व्यक्त केला.

नायगाव शहरातील व्यापारी वर्गाच्या समस्या, वाहतूक व्यवस्थापन तसेच कायदा-सुव्यवस्थेसंदर्भातील मुद्द्यांवर लवकरच व्यापारी बांधवांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी पत्रकार शिष्टमंडळाला दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!