
नायगाव :
नांदेड जिल्ह्यातील तसेच नायगाव तालुक्यातील बरबडा, घुंगराळा, नरसी या महसूल मंडळांसह जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतकरी पीकविमा लाभापासून वंचित होते. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री ना. दत्तामामा भरणे, जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी तसेच संबंधित पीकविमा कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्याची दखल घेत कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांनी कृषी विभाग, जिल्हाधिकारी आणि पीकविमा कंपनीला वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना तत्काळ पीकविमा लाभ देण्याबाबत आवश्यक निर्देश दिले. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पीकविमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
सावरखेड, रुई, वंजारवाडी, घुंगराळा, हिप्परगा, पाटोदा, बरबडा, आंतरगाव आदी गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा झाल्याची माहिती वसंत सुगावे पाटील यांना दिली. तसेच, पीकविमा मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल त्यांनी वसंत सुगावे पाटील यांचे आभार व्यक्त केले.
दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली पीकविमा रक्कम मिळू लागल्याने संबंधित गावांतील शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लवकरात लवकर लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



