ताज्या बातम्यानांदेडनायगावशेती

सोयाबीन बियाणे वाटपास प्रारंभ; शेतकऱ्यांना पेरणीबाबत कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी देवरे यांचे आवाहन.

नायगाव तालुक्यात सोयाबीन बियाण्यासाठी 5,700 शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त ; प्रथम प्राधान्य यादीतील 1,274 शेतकऱ्यांची निवड झालेली आहे.

शंकर पाटील अडकिने

नायगाव तालुक्यात सोयाबीन बियाण्यासाठी एकूण 5,700 शेतकऱ्यांनी अर्ज केले असून, “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वानुसार 1,274 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या या शेतकऱ्यांना एकूण 669 क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवश्यकता आहे.

सदर बियाण्याचा पुरवठा महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आजपर्यंत एकूण 360 क्विंटल बियाण्याचा पुरवठा प्राप्त झाला असून, प्रथम प्राधान्य यादीतील पहिल्या 655 शेतकऱ्यांना पुरेल एवढ्या बियाण्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

महाबीजचे अधिकृत वितरक गजानन कृषी सेवा केंद्र, नायगाव, वसंत अॅग्रो एजन्सी, नायगाव तसेच राष्ट्रीय बीज निगमचे अधिकृत वितरक मन्याड खोरे शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या मार्फत बियाण्याचे वितरण सुरू आहे.

दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे. पेरणीलायक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. किमान 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर पेरणी केल्यास दुबार पेरणीची वेळ टाळता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी देवरे यांनी केले आहे.आहे.

तसेच, पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. बियाण्यांवर रायझोबियम, पीएसबी (फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया) व ट्रायकोडर्मा यांची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असा सल्लाही कृषी विभागाने दिला आहे.

सोयाबीन पिकाची लागवड करताना रुंद सरी-वरंबा पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पद्धतीमुळे पावसात खंड पडल्यास पिकांना आवश्यक आर्द्रता उपलब्ध राहते, तर अतिवृष्टी झाल्यास अतिरिक्त पाणी शेताबाहेर निघून जाण्यास मदत होते. परिणामी पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनक्षमतेत वाढ होण्यास हातभार लागतो.

याशिवाय, “कापूस उत्पादकता अभियान – कपास क्रांती 2026-27” या योजनेअंतर्गत तालुक्यातील सर्व शेतकरी उत्पादक गटांनी महाडीबीटी प्रणालीवर सघन कापूस लागवड व क्लोजर स्पेसिंग बाबत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत  तालुका कृषी अधिकारी देवरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!