
बाळासाहेब पांडे
महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेत आपल्या ओजस्वी आणि सामाजिक कीर्तनांद्वारे प्रेरणादायी ठसा उमटवणारे सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणेकर) यांनी पुन्हा एकदा समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या संत सेवा ट्रस्ट संचलित श्री संत चोखोबाराम आश्रम, बुलढाणा यांच्या वतीने श्रीक्षेत्र राहेर (ता.नायगाव) परिसरातील पूरग्रस्त ७१ शेतकरी कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. सायंकाळी राहेर येथील हनुमान मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमात वारकरी भूषण मनोज सावकार गोदमगावकर, सरपंच व्यंकटराव पाटील नरवाडे, प्रकाश हिवराळे, शिवराज पोलीस पाटील नरवाडे, रमेश देव, बालाजी नरवाडे, सौ. जयश्री नरवाडे, धनंजय देशमुख, पत्रकार नरेंद्र येरावार, बालाजी हिवराळे तोरणेकर, भगवान शेवाळे बरबडेकर, हनुमंत चंदनकर आदी मान्यवर उपस्थित होते. आपणही शेतकऱ्यांची लेकरं आहोत; त्यामुळे त्यांच्या दुःखाच्या काळात मदतीचा हात देणं हीच खरी सेवा आहे,” असे विचार हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केले.गेल्या काही दिवसांपासून ते नांदेडसह इतर जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष फिरून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कार्यरत आहेत.या उपक्रमामुळे समाजमनात भावनिक स्पर्श घडवणारे, सेवा आणि श्रद्धेचा संगम घडवणारे हे कार्य कौतुकास्पद ठरले आहे.

