
नांदेड :- (एल.बी.रानडे)
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा ते कांडली रेल्वे स्टेशन या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.मागील सात ते आठ वर्षापासून हा रस्ता धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरील पूल मोडकळीस आले आहेत. मोडकळीस आलेल्या या पुलावरून जड वाहनास प्रवेश बंदी घालण्यात आली. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना तामसा येथे शाळेत जाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. त्याचबरोबर या रस्त्यावर जवळपास 20 ते 25 गावे आहेत. या गावातील नागरिकांचा प्रवास या रस्त्यामुळे अत्यंत खडतर बनला आहे. लोकप्रतिनिधी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला. परंतु लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप गावाकऱ्यांनी केला आहे. तामसा ते कांडली रेल्वे स्टेशन हा रस्ता आणि रस्त्यावरील मोडकळीस आलेल्या पुलाचे तात्काळ बांधकाम करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या गावकऱ्यांनी दिला आहे.

