जयकुमार अडकिने
माहुर :सतत नागरिकांची ये जा, वाहनांच्या प्रचंड वर्दळिने गजबजलेल्या तीर्थक्षेत्र माहूर येथील मुख्य रस्त्यावर रस्ता रोको करत असलेले मोकाट गुरे,हात गाड्यावर व्यापार करणाऱ्या व्यावसायिकांची बेबंदशाही , व्यापारी प्रतिष्ठाना समोरील अतिक्रमणे ,व ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणारे वाहने ठिय्या आंदोलन केल्यासारखे ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी शहर सुशोभीकरण व नागरिकांच्या सोयी सवलतीसाठी माहूर शहरातून जात आलेल्या महामार्गाचे शंभर फुटाच्या मुख्य रस्त्याचे रूपांतर 50 फुटावर येऊन पोहोचले आहे.परिणामी वाहतुकीच्या कोंडीचा फटका व्यापार पेठत खरेदी विक्री साठी येणाऱ्या महिला मुलांसह भाविकांना सोसावा लागतो .शिवाय हात गाडीवरील भोंगे , फेरीवाल्यांचे वाटेल तेथे मांडलेले बसतान,प्रवासी वाहतूक करणारी वाहने हे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस,बस स्थानकात व बाहेर जाण्या च्या अरुंद वळनावर बस चालकासाठी डोकेदुखी ठरत असल्याने वाहतूक पोलिसांची नेमणूक होऊन कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी अशी मागणी शांतताप्रिय नागरिकाकडून होत आहे.
देवभूमी व तालुक्यातील ठिकाण असलेले श्रीक्षेत्र माहूर शहरातील स्थानिक नागरिक व बाहेरगावावरून येणाऱ्या भाविकांची लोकसंख्या पाहता माहूरचे टी पॉईंट ते ग्रामीण रुग्णालय माहूर हा मुख्य रस्ता प्रशस्त होणे गरजेचे होते. नगरपंचायत माहूर व राजकीय नेत्यांच्या मागणीला हिरवा कंदील देत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरींनी मोठा नीधी उपलब्ध करून दिला व शहरातील मुख्य रस्ता प्रशस्त बनला. या कामासाठी पर्यायाने अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्याने शहरातील मुख्य रस्त्यांने मोकळा श्वास घेतला होता,मात्र हा राष्ट्रीय महामार्ग पुर्णत्वास जातो न जातो तोच दिवस रात्र अतिक्रमणाच्या प्रतिक्षेत पान टपऱ्या चहाचे दुकान व फळ भाजी भाजी विक्रेत्यांनी त्या जागेवर आपले दुकान थाटले. त्यात जी मोठी व्यापारी प्रतिष्ठाने आपली शेड टाकून अतिक्रमण केले त्यांनी समोरील व्यवसायिकांची आठ ते पंधरा हजार दर महिन्याला भाडे आकारून बस्तान मांडण्याची परवानगी दिली.म्हणजे जागा महामार्ग विभाग मालकिची आणि भाड्याचे उत्पन्न मात्र खाजगी व्यापाऱ्यांच्या खिशात असे चित्र आज मितीस निदर्शनास येते.त्या ही समोर ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणारी वाहने व फिरणारे हात गाड्यांमुळे राज्यमार्गाची परिस्थिती सध्या साध्या रस्त्यात झाली आहे .सोमवारी आठवडी बाजारात तर हात गाडीवाले चक्क रोड द्विभाजकातील मध्ये रस्त्यावर ठाण मांडून बसतात. परिणामी राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या गाड्यांना रस्ता मिळणे दुरापास्त होते. कुण्या सुज्ञ नागरिकांनी या बहाद्दरांना समजावण्याचा प्रयत्न केल्यास त्वरित बाचाबाची वर हात घाईवर येण्यास हे व्यापारी मागे पुढे पाहत नाहीत. परिणामी सणासुदीच्या काळात माहूरच्या कायदा कायदा व सुव्यवस्थेला गालबोट तर लागणार नाही ना अशी शंका शांततापूर्ण नागरिकांना आहे. शहरातील वाहतुकीच्या कोंडीची ही गंभीर समस्या नव्याने रुजू झालेले कर्तव्य कठोर पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्यासमोर आवाहन असून सार्वजनिक बांधकाम विभाग ,नगरपंचायत प्रशासन तसेच महसूल प्रशासनाने गांधारीची भूमिका न घेता नागरिकांना व भाविकांना होत असलेल्या त्रासाबद्दल कायम तोडगा काढावा अशी रास्त मागणी सर्वसामान्यां कडून होत आहे.

