राजकीय वार्तापत्र –जयकुमार अडकीने
किनवट/माहूर- सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीला अजून चार वर्षाचा अवधी असला तरी माजी आमदार स्व. प्रदीप नाईक यांच्या मृत्यूने निर्माण झालेली पोकळी भरून संधी साधण्याच्या अनेकजण प्रयत्नात असून ज्ञाती बांधव कार्यकर्त्यांचा मेळा भरवून लक्ष वेधून घेण्याचे काही जण प्रयत्न करीत असल्याने आता पासूनच किनवट विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीच्या हलक्या झुळूक पाहायला मिळत आहे.
आदिवासी व बंजारा बहुल मतदार संघात माजी मंत्री डी.बी पाटील वगळता आलटून पालटून बंजारा समाजाचे स्व.उत्तमराव राठोड, स्व. किशनराव पाचपुते,स्व.प्रदीप नाईक व विद्यमान आ. भीमराव केराम यांना मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. १५ वर्षे मतदार संघाचे सलग प्रतिनिधित्व केलेले प्रदीप नाईक सलग दोन वेळा पराभूत होऊन विद्यमान आमदार केराम यांना संधी मिळाली त्यानंतर अवघ्या काही दिवसातच प्रदीप नाईक यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांचे कुटुंबीय अजूनही त्या दुखातून सावरले नसतांनाच आता रान मोकळे झाले असे मानून मुंबईच्या एका सनदी अधिकाऱ्याने मतदार संघात जनसंपर्क वाढविला असून मतदार संघात बहुसंख्य मतदार असलेल्या ज्ञाती बांधवाच्या भेटी गाठी घेऊन आता तुमच्या सुख दुखाचा मीच वाली म्हणून मुंबईतून रिमोट चालवत संपर्क करतांना दिसत आहे.
चाणाक्ष अधिकाऱ्याने सर्वच विचारधारेचे लोक आपल्यासोबत जुळावे म्हणून व सध्या शासकीय सेवेत असल्याने कोणत्या राजकीय पक्षाशी आपली सलगी आहे ही बाब झाकून ठेवत मित्रमंडळाच्या बॅनर खाली उपक्रम राबविणे सुरु ठेवले आहे. माजी आ. प्रदीप नाईक यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आपण सक्रीय झालो असल्याचे जरी ते स्वतः सांगत असले तरी त्यांचे खास विश्वासू लोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मूकसमंतीनेचे मंत्रालयात पदावर असतांना हा उपक्रम भाऊ राबवत असल्याचे खाजगीत सांगतात. त्यामुळे २०२९ मध्ये भाजपकडून निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे स्पष्ट होतांना दिसत आहे.
त्यामुळे धर्मनिरपेक्ष, व पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते मात्र आता सावध पवित्रा घेत असल्याचे दिसून येत असून स्व.प्रदीप नाईक यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती बेबीताई नाईक व सुपुत्र कपिल नाईक यांना दुखःतून सावरून जनसेवेत रममाण होऊन मैदानात सज्ज होण्याचे साकडे घालत असल्याचे सांगण्यात येत आहे.
यापूर्वी सुद्धा एका नेत्याने असाच प्रयोग राबविण्याचा प्रयत्न केला सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी साठी विचारणा केली नसल्याने शेवटी अपक्ष मैदानात उतरून ५ हजार मते मिळविली होती. त्यामुळे ऐनवेळी पक्ष जाहीर करून निवडणूक लढल्यास कितपत यशस्वी होईल हे पाहणे महत्वाचे आहे.
याचे कारण म्हणजे हा मतदारसंघ बंजारा, आदिवासी बहुल जरी असला तरी, मुस्लीम, मराठा, बौद्ध व इतर अनुसूचित जमाती, इतर भटक्या विमुक्त जाती जमाती, माळी, वंजारी व तेलगु भाषिक व अन्य छोटे छोटे जाती समुहाची दोन्ही पेक्षा जास्त संख्या असल्याने कोणाला आमदार करायचे याची चावी या घटकाकडेच आहे हे निर्विवाद सत्य कुणीही नाकारू शकत नाही तूर्तास एवढे पुरे.

