ताज्या बातम्यानांदेडनायगाव

नाफेड खरेदी केंद्रांच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांचा इशारा.

अतिरिक्त वजन, हमाली व नियमबाह्य कपातीवर कारवाईची मागणी.

नायगाव :

तालुक्यातील व जिल्ह्यातील नाफेड खरेदी केंद्रांवर हरभरा खरेदी प्रक्रियेदरम्यान होत असलेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात शेतकरी बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट इशारा दिला आहे. खरेदी प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार, अतिरिक्त आकारणी किंवा नियमबाह्य कपात सहन केली जाणार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

शासकीय नियमांनुसार एका बॅगेचे वजन ५० किलो ४३० ग्रॅम इतकेच घ्यावे, जादा वजन जबरदस्तीने घेऊ नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यापेक्षा अधिक वजन घेण्याचा प्रयत्न झाल्यास शेतकरी त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून थेट पणन महासंघ व जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करतील, असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच हमाली, बारदाना व वाहतूक खर्च शेतकऱ्यांकडून घेऊ नये, कारण शासनाकडून प्रतिक्विंटल ५५ रुपये हमाली देण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले.

खरेदी केंद्रांवर शासनाचे नियम, निकष व अटी स्पष्टपणे मोठ्या फलकावर लिहिण्याची मागणीही करण्यात आली आहे. माल खरेदी झाल्यानंतर शासनाकडून फार्मर प्रोड्युसर कंपनीला प्रतिक्विंटलनुसार थेट पैसे दिले जात असल्याने शेतकऱ्यांवर कोणताही दबाव किंवा बेकायदेशीर आकारणी करू नये, असेही सांगण्यात आले.

दरम्यान, हरभरा खरेदीसाठी माल केंद्रावर नेण्यापूर्वी शेतकऱ्यांनी घरीच ओलावा (मॉइश्चर) तपासून घ्यावा. मशीनमध्ये १५० ग्रॅम नमुना टाकून तपासणी करावी व ओलावा १४ टक्क्यांपेक्षा कमी असल्यासच माल खरेदीसाठी नेल्यास अनावश्यक त्रास टाळता येईल, असे आवाहनही करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया : शेतकरी गजानन पाटील (नायगाव) म्हणाले, “शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून माल तयार करतात. मात्र खरेदी केंद्रांवर अतिरिक्त वजन व हमालीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट होत असल्याच्या तक्रारी आहेत. शासनाचे नियम पाळले गेले पाहिजेत.”

शेतकरी केशव शिंदे (मांजरम) यांनी सांगितले, “खरेदी केंद्रावर पारदर्शकता असावी. शासनाकडून हमाली दिली जात असताना शेतकऱ्यांकडून पैसे घेणे अन्यायकारक आहे. अशा प्रकारे कोणी पैसे मागितले तर आम्ही तक्रार करू.;तर शेतकरी बालाजी परिहार (कोलंबी) म्हणाले, “माल खरेदी करताना ओलावा, वजन आणि इतर नियम स्पष्ट असावेत. शेतकरी एकजूट झाली तर कोणत्याही अन्यायाला आळा बसू शकतो.

शेतकऱ्यांनी एकजूट ठेवून आपल्या हक्कासाठी आवाज उठवण्याचे आवाहन करत नियम पाळले नाहीत तर तक्रार, आंदोलन आणि कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!