
नायगाव : बाळासाहेब पांडे
तालुक्यातील मरवाळी गावातून जाणाऱ्या टेंभूर्णी कुंचेली शंकरनगर,या रस्त्याचे काम होत आहे. या रस्त्यावर काही नागरिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी कमी करण्यात येत आहे. तसे न करता येथील अतिक्रमणे काढून रस्त्याची रुंदी पर्याप्त ठेवावी, अशी मागणी संजय चिखले यांनी केली आहे.
यासंदर्भात संजय चिखले यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन दिले आहे. मरवाळीगावठाणातून जाणाऱ्या टेंभूर्णी ते कुंचेली रोडचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून बांधकाम विभागाच्या माहितीनुसार रस्त्याची रुंदी ३३ फूट असल्याचे चिखले यांनी नमूद केले आहे. परंतु या रस्त्यावर काही जणांनी अतिक्रमण करून बांधकाम केल्याची बाब चिखले यांनी अधोरेखित केली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम २२ फूटच होणार असल्याचा चिखले यांचा आक्षेप आहे. एवढा अरुंद रस्ता झाल्यास रहदारीस पर्याप्त असणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. स्थानिक
ग्रामपंचायतीने गावातील कच्चे व पक्के अतिक्रमण काढून रस्त्याचे काम नियमानुसार रुंदी ठेवून करून घेणे अपेक्षित असताना त्यांनी २२ फूट रुंदीच्या रस्त्याचा ठराव घेतल्याचा मुद्दा चिखले यांनी निवेदनातून समोर आणला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गावातील या रस्त्यावरील अतिक्रमण काढावे व टेंभूर्णी ते कुंचेली रस्त्याची रुंदी शासनाच्या नियमानुसार पर्याप्त ठेवावी, अशी मागणी मरवाळी येथील संजय चिखले यांनी केली आहे.

