
श्रीक्षेत्र माहूर – जयकुमार अडकीने
आदिशक्ती श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक माहूरगड येथे दाखल होतात. भाविकांच्या सोयीसाठी शासनाच्या वतीने स्कायवॉकच्या माध्यमातून आई श्री रेणुका मातेचे दर्शन सुलभ व्हावे या हेतूने विशेष प्रकल्प राबवण्यात येत आहे. परंतु, यास आता 18 महिने पूर्ण होत आले तरी कामाचा वेग अत्यंत संथ असल्याने फक्त 30 टक्केच काम पूर्ण झाले आहे. नांदेड जिल्हाधिकारी यांनी 17 एप्रिल रोजी स्थानिक व्यापाऱ्यांचे समुपदेशन करून पुनर्वसनाचा मार्ग काढून एक महिना लोटूनही प्रत्यक्ष कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने भाविक व व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केल्या जात आहे. अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने हटवून सहकार्य करीत असतानाही प्रशासनाकडून कामावर पुरेशी गती दिसून येत नाही. भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अप्रतेक्ष थेट मागणी केली आहे – “गडकरी साहेब, स्कायवॉकचे काम कधी पूर्ण होणार?” त्यांच्या म्हणण्यानुसार, हा स्कायवॉक कोणतीही अडचण नसून उलट खोळंबा झालेली आहे. त्याचा परिणाम यात्रा काळात होणाऱ्या गर्दीवर, सुरक्षेवर व सुविधांवर थेट दिसून येतो.
!शासकीय बांधकाम विभागाकडे हे काम असून, जिल्हा प्रशासनाकडून देखील विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कामाच्या प्रगतीचा आढावा नियमित घेतला गेला पाहिजे, असे मत अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिकांनी मांडले आहे.
स्कायवॉकचे काम लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा भाविकांमधून व्यक्त होत आहे.!
भाविकांना सुरक्षित व अडथळाविरहित मार्ग मिळावा हा स्कायवॉक तयार करण्यामागचा उद्देश शासनाचा आहे.
प्रशासनाने नियमित प्रगती अहवाल जाहीर करावा.
स्थानिक व्यापार्यांचे व्यवस्थित पुनर्वसन व्हावे
या सर्व पार्श्वभूमीवर आता सर्वांच्या नजरा शासन व खासदार-आमदारांकडे लागलेल्या आहेत. स्कायवॉक हे नुसते एक बांधकाम प्रकल्प नसून, ते श्रद्धेचा मार्ग आहे, हे शासनाने लक्षात घेऊन कामाला तातडीने गती द्यावी, अशी मागणी सर्व स्तरांमधून होत आहे.

