
- माहूर – तीर्थक्षेत्राचे शहर असलेल्या माहूर शहरातील नागरिकांच्या विविध अडचणी व समस्याची सोडवणूक करून तालुक्यातील नागरिकांना दिलासा देणे बाबतच्या मागण्या बाबत कोणतीही दखल न झाल्याने दि.२२/०७/२०२५ पासून तहसील कार्यालय माहूर समोर शेकडो कार्यकर्त्यासह बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटनिस आनंद पाटील तुपदाळे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना माहूर तहसीलदार यांचे मार्फत सादर केलेल्या निवेदनात दिला आहे.
माहुर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून सुद्धा प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे स्थानिक नागरिकांना विविध अडचणीना सामोरे जावे लागते त्या नागरिकांच्या अडचणी समजून घेत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटनिस आनंद पाटील तुपदाळे यांनी प्रशासनाला जागे करून समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. माहूर शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेचे अनुदान मिळाले नसल्याने अनुदानाचे पैसे वेळेत न मिळाल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत आले आहेत. तसेच माहूर शहरात अनेक लोक भूमिहीन असल्याने माहूर शहरातील जागा उपलब्ध नसलेल्या नागरिकांना पंतप्रधान आवास योजने अंर्तगत जागा उपलब्ध करून घरकुल योजनेचा लाभ मिळावा. रेती अभावी तालुक्यातील व माहूर शहरातील विविध आवास योजनेच्या लाभार्थ्याचे घर बांधकाम थांबले असल्याने माहूर शहरातील पंतप्रधान आवास योजनेच्या एकूण ६०० लाभार्थ्यांना शासना मार्फत ५ ब्रास रेती मोफत मध्ये तात्काळ उपलब्ध करून द्यावी. माहूर शहरातील तानू शहा बानू शहा दर्गा परिसर पासून माहूर बस स्थानकाचे जास्त अंतर असल्याने नागरिकांना ये-जा करण्यास बसस्थानक पर्यत ये-जा करण्यास जवळपास १०० रु. खर्च होतात जर त्या ठिकाणी एसटी बसचा विनंती थांबा मंजूर केल्यास नागरिकांची सुविधा होऊ शकते त्यामुळे माहूर शहरातील तानु शाहा बानू शाहा दर्गा परिसर जवळ विनंती बस थांबा द्यावा. आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. सदर मागण्याबाबत यापूर्वी सुद्धा अनेक वेळा संबधित विभागाच्या प्रमुख अधिकार्यांना निवेदने सादर केली मात्र आजपर्यत निवेदनाची व मागण्याची दखल झालेली नाही त्यामुळे व्यथित होऊन मागण्याच्या अनुषंगाने दि.२२ जुलै. २०२५ रोजी शेकडो घरकुल लाभार्थ्याससह तहसिल कार्यालय माहुर समोर बेमुदत अमरण उपोषण सुरु करणार असल्याचे आनंद पाटील तुपदाळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.निवेदनाच्या प्रती,मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी,नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड. विभागीय नियंत्रक रापम विभाग नांदेड माहूर पोलीस निरीक्षक पो.स्टे माहूर, रापम आगार प्रमुख माहूर आदींना सादर केल्या आहेत.

