( कृषी वार्तापत्र) – जयकुमार अडकीने
माहूर- सध्या राज्यभरात अवकाळी पावसाने काहीसा विराम घेतला असून, त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा मशागतीच्या कामांना गती दिली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने अवेळी हजेरी लावून मशागतीच्या कामात अडथळा आणल्याने शेतीची कामे रखडली होती. मात्र आता हवामानात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे. मशागत, कुळवणी, खत व कीडनाशकांची फवारणी आदी पूर्वतयारीची कामे वेगात सुरू झाली आहेत. काही भागांत शेतकरी शेतात राबताना दिसत असून शेतीसाठी लागणाऱ्या अवजारे, बियाणे, खते यांची खरेदीसाठीही बाजारात गर्दी होतांना दिसत आहे.
बोगस बियाण्यांपासून सावधान !
दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारात बोगस बियाण्यांचा सुळसुळाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत आणि मान्यताप्राप्त वितरकांकडूनच बियाण्यांची खरेदी करावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे. बोगस बियाण्यांमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
मान्सून दाखल झाल्यानंतरच पेरणी करावी हवामान विभागाच्या अंदाजानुसार, लवकरच मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांनी घाई करून पेरणी करू नये. योग्य वेळेची वाट पाहूनच, मान्सून पूर्णपणे स्थिर झाल्यानंतर पेरणी करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. वेळेपूर्वी केलेली पेरणी पावसाअभावी वाया जाण्याची शक्यता असते तेव्हा शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून खरीप हंगामासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत पिकविमा आणि अनुदानित बियाण्यांची माहिती घेणेही फायदेशीर ठरेल. ३४ हजार ५६ हेक्टर वर होणार खरीप हंगामाचा पेरा !
तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ५१ हजार ६२५.६९ हेक्टर असून पेरणी योग्य क्षेत्र ३४ हजार ४०१.७३ हेक्टर आहे. तालुक्यातील चार महसूल मंडळा पैकी माहूर मंडळाचे भौगोलिक क्षेत्र १३ हजार ७१२ .९९ हेक्टर असून पेरणी योग्य क्षेत्र ८ हजार १२७.४० हेक्टर आहे.वाई मंडळाचे भौगोलिक क्षेत्र ९ हजार ७१.४६ हेक्टर असून पेरणी योग्य क्षेत्र ७ हजार ९८९.९३ हेक्टर आहे, वानोळा मंडळाचे भौगोलिक क्षेत्र १६ हजार २७४ .३८ हेक्टर असून पेरणी योग्य क्षेत्र ८ हजार ७००.६५ हेक्टर आहे, सिंदखेड मंडळाचे भौगोलिक क्षेत्र १२ हजार ५६६ .६९ हेक्टर असून पेरणी योग्य क्षेत्र ९ हजार ५८३ .७५ हेक्टर आहे. यावर्षी ज्वारी ४०० हेक्टर, तूर ३ हजार ६८३ हेक्टर उडीद ३६१ हेक्टर, मुग ३८६ हेक्टर सोयाबीन १० हजार २२४ हेक्टर, कापूस १८ हजार २५५ हेक्टर, हळद ४२३ हेक्टर व इतर ३६४ एक्कर असा एकूण ३४ हजार ५६ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाचा यावर्षीही पेरा होण्याची शक्यता आहे.

