
नायगाव : बाळासाहेब पांडे
घुंगराळा येथील युवा कलाकार तथा कीर्तन, सप्ताह आणि विवाह सोहळ्यांमध्ये गायन-वादन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे कै. श्रीधर गोपीनाथ पांचाळ यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी पुढाकार घेत मित्रमंडळाच्या माध्यमातून ३१ हजार ७०० रुपयांची आर्थिक मदत जमा करून ती पांचाळ कुटुंबीयांच्या स्वाधीन केली.
कै. श्रीधर पांचाळ यांचे गेल्या आठवड्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांच्या निधनामुळे परिवारासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
यापूर्वीही श्रीधर पांचाळ यांच्या भावाचे अकाली निधन झाल्यानंतर वसंत सुगावे पाटील यांनी त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात दिला होता. यावेळीही मित्रमंडळाच्या सहकार्याने निधी उभारून पांचाळ कुटुंबाला आधार देण्यात आला.
यावेळी बोलताना वसंत सुगावे पाटील यांनी, “पांचाळ कुटुंबाला भविष्यातही शक्य ती सर्व मदत केली जाईल. तसेच श्रीधर पांचाळ यांच्या मुलांना व पत्नीला शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,” असे सांगितले. या योजनेअंतर्गत पात्र मुलांना दरमहा २,२५० रुपयांचे अर्थसाहाय्य मिळू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी घुंगराळा येथील सरपंच सौ. रूक्मिणबाई पांचाळ, माजी विस्तार अधिकारी नागोराव दंडेवाड, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष श्याम यमलवाड, अच्युतराव ढगे, माजी उपसरपंच शिवाजी ढगे, व्यंकटराव सुगावे, प्रल्हाद ढगे, भगवान सुगावे, राम सुगावे, आनंदा सुगावे, परबंता हनमंते, विलास ढगे, राजेश ढगे, पांडुरंग मेलफदवार, साईनाथ सुगावे, मुरारी तुरटवाड, बालाजी हाळदेवाड, सहदेव तुरटवाड, बंटी बोधनकर, माधव जलदेवार यांच्यासह ग्रामस्थ, मित्रपरिवार व पांचाळ कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कलाकाराच्या कुटुंबाला समाजाचा आधार
गायन-वादनाच्या कलेच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या श्रीधर पांचाळ यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देत समाजातील संवेदनशीलतेचे दर्शन घडले आहे. मित्रमंडळाच्या माध्यमातून उभारण्यात आलेली मदत आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची भूमिका यामुळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळणार आहे.



