ताज्या बातम्यानांदेडनायगाव

वादळाचा तडाखा : लालवंडीतील शेतकऱ्याचे सोलार यंत्रणेचे मोठे नुकसान ; नायगाव तालुक्यातील अनेक गावांत घरांचे, शेतीचे व फळबागांचे नुकसान; पंचनाम्याची मागणी.

नायगाव : बाळासाहेब पांडे

नायगाव तालुक्यात 31 मे 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक गावांना तडाखा दिला. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून गेली, काही घरांची पडझड झाली तर शेतातील सौरऊर्जा प्रकल्पांचेही मोठे नुकसान झाले. या वादळात लालवंडी येथील शेतकरी काळेश्वर पिराजी बोमनाळे यांच्या शेतातील सोलार यंत्रणा उन्मळून पडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

लालवंडी येथील गट क्रमांक 101 मधील शेतात उभारण्यात आलेली सोलार यंत्रणा वादळी वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे जमिनीतून उपटली जाऊन खाली कोसळली. सोलार पॅनेल, लोखंडी संरचना व विद्युत जोडणीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याबाबत माहिती देताना शेतकरी काळेश्वर बोमनाळे यांनी सांगितले की, शेतीतील वाढता खर्च, उत्पादनातील अनिश्चितता आणि आर्थिक अडचणींमुळे आधीच संकटात असताना आता वादळामुळे सोलार यंत्रणेचे नुकसान झाल्याने आणखी आर्थिक भार पडला आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, तालुक्यातील अनेक भागांत वादळामुळे आंब्याच्या झाडांवरील मोठ्या प्रमाणात फळे जमिनीवर पडली. त्यामुळे फळबागधारकांचेही मोठे नुकसान झाले आहे. नायगाव शहरातील वेंकटेश नगर परिसरात एक पुरातन व विशाल वृक्ष भरवस्तीत कोसळल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र एका घराच्या पडदीचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

वादळाच्या तडाख्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून महसूल प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करावेत व नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

वादळामुळे झालेले प्रमुख नुकसान

लालवंडी येथे शेतातील सोलार यंत्रणा कोसळली , अनेक घरांवरील पत्रे उडून गेली,  काही घरांची पडझड , आब्याच्या झाडांवरील मोठ्या प्रमाणात फळगळ, वेंकटेश नगर येथे पुरातन वृक्ष कोसळला वाहतुकीस काही काळ अडथळा , नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना मदतीची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी : काळेश्वर पिराजी बोमनाळे रा. लालवंडी, ता. नायगाव (खै.), जि. नांदेड गट क्रमांक : 101

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!