
नायगाव
घुंगराळा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पहिलीतील नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत बैलगाडी मिरवणुकीच्या पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. संपूर्ण गावातून ही मिरवणूक काढण्यात आली, ज्यामुळे गावात उत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाला नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. राजेशजी पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थिती देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, शैक्षणिक साहित्य व शुभेच्छा देण्यात आल्या.
भाजप तालुका अध्यक्ष बालाजी मदेवाड,हेंडगे साहेब,शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक बोरगावे सर, शाळेतील सर्व शिक्षक वृंद, गावकरी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवेशोत्सव केवळ स्वागतपर कार्यक्रम न राहता, तो शिक्षणास सुरुवात करणाऱ्या बालकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
यावेळी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नियुक्त झालेल्या श्री. बोरगावे सर आणि नव्याने शाळेत रुजू झालेल्या लिपिक श्री. अमिलकंठवार यांचा वसंत सुगावे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा उपक्रम शासकीय शाळांच्या प्रतिमेला उजाळा देणारा ठरला आहे. लोकप्रतिनिधी आणि पक्ष पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे ग्रामस्तरावर शिक्षणाला मिळणारी प्रतिष्ठा अधिक बळकट झाली आहे. संपूर्ण राज्यात जिल्हा परिषद शाळा आणि त्यांच्या उपक्रमांविषयी सकारात्मक संदेश देणारा हा कार्यक्रम एक आदर्श ठरत आहे

