
माहूर :
येथील श्री रेणुका देवी महाविद्यालय, श्रीक्षेत्र माहूर च्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातील दोन स्वयंसेवकांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर राज्यस्तरीय स्तरावर झेप घेतली आहे. महाविद्यालयातील बी.एस्सी. द्वितीय वर्षात शिकणारे विद्यार्थी शेंडे आकाश आणि हातमोडे नरसिंह यांची निवड राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर ‘आव्हान २०२६’ साठी करण्यात आली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्तरावर झालेल्या निवड चाचणीतून या दोन्ही विद्यार्थ्यांची त्यांच्या उत्कृष्ट शारीरिक क्षमता आणि शिस्तीच्या जोरावर निवड झाली आहे. राज्यभरातील निवडक स्वयंसेवकांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या या शिबिरात या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रगत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रफुल्लजी राठोड यांनी आनंद व्यक्त केला असून दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. “आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी राज्यस्तरावर चमकत आहेत, ही संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे,” अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी महाविद्यालयाचे एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. अभिजीत कांडलीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद आणि कर्मचारी यांनी शेंडे आकाश व हातमोडे नरसिंह यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

