ताज्या बातम्यानांदेडनायगाव

कष्टकरी कुटुंबियांच्या मुलाने PSI पद गाठले!

आंतरगावच्या ज्ञानेश्वर शिंदे यांचा एमपीएससीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक.

नायगाव : बाळासाहेब पांडे

नायगाव तालुक्यातील आंतरगाव येथील जिद्दी युवक ज्ञानेश्वर शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे आंतरगावसह संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत ज्ञानेश्वर शिंदे यांनी हे यश मिळवले आहे. वडील बालाजी शिंदे हे अल्पभूधारक शेतकरी असून आई कस्तुराबाई शिंदे या शेतीसोबतच घरकाम सांभाळत मुलाच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटत होत्या. आर्थिक अडचणींवर मात करत त्यांनी मुलाला उच्च शिक्षण दिले आणि त्याचाच परिपाक म्हणून ज्ञानेश्वर यांनी हे यश संपादन केले.

स्पर्धा परीक्षेच्या कठीण प्रवासात शिंदे यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर अनेक अडथळे पार केले. योग्य नियोजन, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी PSI पद गाठत जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवले आहे.

“यश मिळवण्यासाठी सातत्य आणि आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा असतो. योग्य दिशेने प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही,” असे मत व्यक्त करत शिंदे यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मार्गदर्शक शिक्षक आणि मित्रपरिवाराला दिले.

दरम्यान, त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गावात उत्साहाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सामाजिक संस्था, स्थानिक नागरिक तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी भेट देत अभिनंदन केले. लवकरच गावात भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

आंतरगावचे सुपुत्र ज्ञानेश्वर शिंदे यांच्या या यशामुळे गावाचे नाव राज्यभर उज्ज्वल झाले असून, त्यांच्या कामगिरीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. ही माहिती बळवंत गोविंदराव पाटील शिंदे (उर्फ मोदी, आंतरगावकर) यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!