ताज्या बातम्यानांदेड

रेणुका देवी संस्थान कर्मचाऱ्यांना विश्वस्त समितीकडून नव्या वर्षाचे बक्षीस, वीस वर्षांहून अधिक काळ सेवेत असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांसह 64 कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेतले! 

नांदेड – जयकुमार अडकीने

रेणुकादेवी संस्थान माहूर येथील सेवेत गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ६४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दि. २३ डिसेंबर २५ रोजीच्या ठराव क्रमांक ३ नुसार सर्व विश्वस्त मंडळाच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार संबंधित ६४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना दि. १ डिसेंबर २५ पासून त्यांच्या मूळ नियुक्ती पदावर व नमूद वेतनश्रेणीत कायम करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. हे आदेश श्री रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक, सचिव सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्र दोनतुला यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पारित करण्यात आहेत. राज्यातील जगदंबा संस्थान, मोहटादेवी व सप्तशृंगी निवासिनी देवस्थान, नाशिक येथील नियमांच्या धर्तीवर श्री रेणुकादेवी संस्थान

माहूर येथील कर्मचाऱ्यांनाही

सेवा नियम, वेतनश्रेणी वर कायमस्वरूपी लाभ देण्यात यावा, अशी मागणी कर्मचारी वर्गाकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. अनेक वर्षांपासून संस्थानात कार्यरत कर्मचारी अत्यल्प मानधनावर सेवा बजावत होते. त्यांना कर्तव्ये, अधिकार, रजा नियम, सेवा नियम निश्चित करून देण्यात यावेत, यासाठी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी निवेदनेही सादर केली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश मिळाल्याने माहूरगडावर कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्मचारी वर्गाच्या वतीने विश्वस्त मंडळाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. श्री रेणुका देवी कर्मचाऱ्यांतर्फे संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष, पदसिद्ध सचिव, पदसिद्ध कोषाध्यक्ष माहूर तहसीलदार अभिजीत जगताप, पदसिद्ध उपाध्यक्ष माहूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे सह सात अशासकीय सदस्यांचे आभार मानण्यात येत आहे. न्यासाच्या 14 जुलै 2014 च्या घटनेतील कलम 32 मध्ये संस्थानातील कर्मचाऱ्यांना सेवेत स्थैर्य द्यावे जेणेकरून ते प्रसन्न मनाने सेवा करतील व गडावर देशभरातून येणाऱ्या भाविकांना सुद्धा प्रसन्नता वाटेल यासह धर्मदाय आयुक्त यांच्या आदेशाची खऱ्या अर्थाने एका तपानंतर अंमलबजावणी झाली असल्याने ” देर आये दुरुस्त आये ” या उक्तीप्रमाणे उशिरा का होईना गोरगरीब कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला याबाबत रेणुका मातेच्या लाखो भक्तांकडून विश्वस्त समितीचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!