ताज्या बातम्यानांदेडनायगाव

नायगाव तहसीलमध्ये ‘बोगस’ कर्मचाऱ्याचा आठ वर्षांचा कारभार उघड.

अधिकाऱ्यांची तात्काळ कारवाई; पुरवठा विभागातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह.

नायगाव : बाळासाहेब पांडे

नायगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात एक खाजगी व्यक्ती तब्बल आठ वर्षे शासकीय कर्मचारी म्हणून काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून शिवसेना शहरप्रमुख गजानन पाटील तमलुरे यांनी केलेल्या तक्रारीनंतर एएसआय अधिकारी अनन्या रेड्डी यांनी तत्काळ कारवाई करत संबंधित व्यक्तीला तहसील कार्यालयातून हद्दपार करण्याचे आदेश दिले.

मिळालेल्या माहितीनुसार यश सोनकांबळे या व्यक्तीची सुमारे आठ वर्षांपूर्वी केवळ तीन महिन्यांसाठी ई-मशीन ऑपरेटर म्हणून तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर कोणतेही अधिकृत नियुक्तीपत्र नसताना तो पुरवठा विभागातच कार्यरत राहिला. नवीन रेशनकार्ड काढणे, रेशनकार्ड दुरुस्ती करणे तसेच विभागातील नोंदी हाताळणे यांसारखी महत्त्वाची कामे तो शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे करत असल्याची बाब समोर आली आहे.

पुरवठा विभागातील काही आर्थिक व्यवहारही त्याच्याकडूनच हाताळले जात असल्याची माहिती पुढे आली असून त्यामुळे तो बोगस असतानाही विभागातील ‘आवडता कर्मचारी’ म्हणून वावरत असल्याची चर्चा नागरिकांत रंगली आहे.

दरम्यान, रेशनकार्ड दुरुस्तीच्या कामासाठी लाच मागितल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पुढे आल्याने हा प्रकार उघडकीस आला. शिवसेना शहरप्रमुख गजानन तमलुरे यांनी एएसआय अधिकारी अनन्या रेड्डी यांची भेट घेऊन तक्रार केल्यानंतर त्यांनी चौकशी करून सोनकांबळे यास तात्काळ तहसील कार्यालयातून बाहेर काढण्याचे आदेश दिले. पुढे तो कार्यालयात आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

तहसील कार्यालयात तब्बल आठ वर्षे खाजगी व्यक्ती शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे काम करत असताना तत्कालीन तहसीलदार व पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष का केले, असा सवाल उपस्थित होत आहे. या काळात झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार का, तसेच या प्रकरणात कोणाचे संगनमत आहे का, याबाबत नागरिकांत चर्चा सुरू झाली आहे.

संगनमताच्या आरोपांमुळे प्रशासन अडचणीत

या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताचेही आरोप पुढे येत असून पुरवठा विभागातील कारभाराबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता जिल्हाधिकारी स्तरावरून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

रजेवर गेलेल्या तहसीलदार गायकवाड मॅडम यांचे पितळ उघडे ?

नायगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात बोगस कर्मचारी काम करत असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर रजेवर गेलेल्या तहसीलदार गायकवाड मॅडम यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुरवठा विभागातील महत्त्वाच्या कामकाजावर खाजगी व्यक्तीचा प्रभाव कसा राहिला, तसेच त्याला इतक्या वर्षे कार्यालयात वावरू कसे देण्यात आले, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. शिवाय तहसील तसेच पंचायत समिती कार्यालयातही काही खाजगी व्यक्ती कारभारी बनल्याची चर्चा उघडपणे होत आहे.

काही नागरिकांनी असा आरोपही केला आहे की, तहसील कार्यालयातील काही महत्त्वाच्या टेबलांचा पदभार आपल्या मर्जीतील व सोयीच्या व्यक्तींनाच देण्यात आला होता. त्यामुळेच अशा प्रकारांना खतपाणी मिळाले का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, तहसीलदार गायकवाड मॅडम रजेवर जाण्यापूर्वी त्यांच्या अधिकृत वाहनात एका वाळू माफियाशी संबंधित व्यक्ती ड्रायव्हरच्या शेजारी समोरच्या सीटवर बसत असल्याची चर्चा परिसरात रंगली होती. मात्र तात्पुरत्या स्वरूपात तहसीलदार पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या रेड्डी मॅडम यांच्या कार्यकाळात हा प्रकार बंद झाल्याचेही सांगितले जात आहे.

निलंबित कर्मचाऱ्याकडेच पुरवठा विभागाच्या गोदामाचा कारभार ?

अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे पुरवठा विभागाच्या गोदामाचा कारभार ज्यांच्याकडे आहे ते कर्मचारी नांदेड येथील एका प्रकरणात अडकलेले असून त्यांच्या संदर्भात चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. अशा परिस्थितीत महत्त्वाचा पदभार देऊ नये, असा नियम असतानाही रसद पुरवठ्याचे काम त्यांच्याकडेच सोपविण्यात आल्याची चर्चा आहे. या प्रकरणात एएसआय अधिकारी अनन्या रेड्डी काय निर्णय घेणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान या विषयावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तहसीलदार रेड्डी मॅडम यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी फोन उचलला नाही. नंतर परत फोन करून त्या सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत असल्याचे सांगून अधिक प्रतिक्रिया देण्यास टाळले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!