
नायगाव,
अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने पंजाब राज्यातील महिला सरपंच, सरपंच, ग्रामविकास विभागातील अधिकारी व महिला वर्ग अशा सुमारे १०० जणांनी नायगाव तालुक्यातील घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी पाहुण्यांचे लेझीम नृत्य, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतीषबाजी व फेटे बांधून भव्य स्वागत केले.
पंजाबमधून आलेल्या मान्यवरांनी ग्रामपंचायत इमारत, अभ्यासिका, व्यायामशाळा, शाळा, अंगणवाडी, विविध जातींच्या स्मशानभूमी, खंडोबा मंदिर व मंदिर परिसरातील विकासकामे पाहणी करून घुंगराळा ग्रामपंचायतीच्या प्रगतिशील उपक्रमांचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमानंतर पाहुण्यांसाठी अल्पोपहार व जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. मनोगत व्यक्त करताना पंजाब राज्यातील महिला सरपंच भारावून गेल्या. गावकऱ्यांनी दिलेल्या प्रेम, आपुलकी आणि पाहुणचारामुळे त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी पंचायत समिती नायगावचे गटविकास अधिकारी वानखेडे साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी मिरजकर साहेब, सरपंच सौ. रुक्मिणीबाई पांचाळ, उपसरपंच वसंत सुगावे पाटील, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्यामराव यमलवाड, माजी अधिकारी नागोराव दंडेवाड, बालाजीराव मातावाड, तंटामुक्ती अध्यक्ष श्यामसुंदर पा. ढगे, शालेय समिती अध्यक्ष माधवराव ढगे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामपंचायत अधिकारी शिंदे साहेब व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

