
माहूर : जयकुमार अडकिने
शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत बिकट झालेले असून,राज्यकर्त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेती अरिष्ट शेतकऱ्यांना संपवण्याच्या मार्गावर असल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र माहूरगड जिल्हा नांदेड (महाराष्ट्र)येथे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 14 आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वतयारीची आढावा बैठक काल दि.28 रोजी स्थानिक जगदंबा धर्मशाळा येथे पार पडली. जातपात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकजुटीसाठी,शेतमालाच्या हमीभावाचा लढा देशपातळीवर लढण्यासाठी मजबूत आणि देशव्यापी शेतकरी संघटना वाढवण्याच्या पसरवण्याच्या आणि आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठीच्या उद्देशाने हे अधिवेशन होणार असून शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव, (भीक नको. घेऊ घामाचे दाम)या मागणीला अग्रभागी ठेवून सद्यस्थितीत कमजोर झालेला आर्थिक सामाजिक समतेचा लढा पुढे नेण्यासाठी, तसेच धार्मिक व जातीय सलोखा टिकवण्यासाठी चा संदेश देशभर पसरवण्याचे नियोजन या अधिवेशनात होणार असून, विद्यार्थी ,युवक, महिला आणि शेतकरी प्रश्न यासाठी देश पातळीवर कार्यक्रम देण्यात आहे.शेतकरी आत्महत्या,बेरोजगारी , महागाई , भ्रष्टाचार,डॉलरच्या तुलनेत रुपयाचे लोटांगण,युवकांचे आर्थिक भवितव्य, स्त्रियांचे शोषण, तंत्रज्ञानाच्या वापराचे शेती व मानवावर होणारे परिणाम आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटी करनासाठी कृती कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे. या अधिवेशनाची जय्यत तयारी करण्यासाठी प्रभावी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मनोज किर्तने यांची संयोजन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे.हे अधिवेशन मार्गदर्शक आणि ऐतिहासिक होण्यासाठी या संयोजन समितीमध्ये महाराष्ट्रातील अनेक विषयातील तज्ञ असलेले संघटनेचे नेते सुद्धा असतील.
अधिवेशनाच्या आढावा बैठकीसाठी ललित बहाळे अध्यक्ष, सरोजा ताई काशीकर माजी आमदार, शैलजा देशपांडे, ज्योत्सना बहाळे, गुणवंत पाटील हंगरगेकर, ॲड.दिनेश शर्मा, युवा प्रदेशाध्यक्ष ॲड.दीपक चटप , उद्योजक मयूर मुळे नेदरलँड, विजय निवळ,सतीश दाणी, मिलिंद दामले, प्राचार्य वि ना कदम, ॲड.धोंडीबा पवार, ज्येष्ठ नेते त्रिभुवन सिंह ठाकुर, रमेश पाटील कदम युवा (जिल्हाध्यक्ष), जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पाटील शिंदे (उंचेगावकर ),पत्रकार आनंदराव शिंदे,पत्रकार शिवाजी जोजार, यांची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीला महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून प्रमुख पुढारी नियोजनासाठी आले होते.
शेतकरी संघटना अधिवेशनानंतर कात टाकणार असून, युवक युवतींचा लक्षणीय सहभाग वाढवत देशभरातील शेतकऱ्यांच्या समग्र एकजुटीसाठी काम करणार असल्याचा संकल्प करण्यात आला.या अधिवेशनाचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात येणार आहे.भव्य, दिव्य, वैचारिक, ऐतिहासिक अधिवेशन होण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेता/ विचारवंत नाना पाटेकर, आम आदमी पक्षाचे राष्टीय प्रवक्ता राघव चढ्ढा, अखिल भारतीय काँग्रेस नेते खासदार शशी थरूर, रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त जागतिक पत्रकार पी साईनाथ यांना मार्गदर्शनासाठी संपर्क करण्यात येणार असून, देशातील आणि राज्यातील विविध क्षेत्रातील तज्ञ असलेल्या काही मान्यवरांना विशेष निमंत्रित करण्यात येणार आहे. अधिवेशनाची पुढील सूक्ष्म नियोजन बैठक दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी पुन्हा माहुरगड येथे घेण्यात येणार आहे.
पहिल्या दिवशी अधिवेशनाचे खुले सत्र राहणार असून दुसऱ्या दिवशी चे प्रतिनिधीसत्र सुद्धा सर्वांसाठी खुले राहणार आहे परंतु अधिवेशनाच्या कामकाजात केवळ नोंदणी झालेले प्रतिनिधीच भाग घेतील.अशा प्रकारचे नियोजन करण्यात येणार आहे.हे अधिवेशन सर्व अंगाने क्रांतिकारी ,ऐतिहासिक आणि ऊर्जादाई होण्यासाठी आयोजन समिती सज्ज असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजनाची ही जबाबदारी सर्वमिळुन नक्कीच पार पाडतील अशी खात्री अध्यक्ष ललित बहाळे यांनी व्यक्त केली.
श्रीक्षेत्र माहूरगड हे दर्शन आणि पर्यटनासाठी सुप्रसिद्ध असून रेणुका माता मंदिर, श्री दत्त प्रभूंचे मंदिर, अनुसया माता मंदिर ,देवेश्वर मंदिर, गुंफा ,सर्वतीर्थ, वनदेव ,कैलास टेकडी तसेच सुफी संत सोना पीर बाबा दर्गा आणि शेख फरीद बाबा यांचा दर्गा तसेच धबधबा हे सुप्रसिद्ध ठिकाणं आहेत.त्याचबरोबर बुद्धभूमी परिसर, पांडवलेणी, मातृतिर्थ यासह अनेक ठिकाणांची यानिमित्ताने भारतभरातून येणाऱ्या प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना जंगल सफारी घडून येईल अशी भावना जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पाटील शिंदे उंचेगावकर यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केली. अनेक मान्यवरांची समयोचीत भाषणे झाली.माजी राज्याध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी सर्वांना संघटनेची शपथ दिली. बैठकीचे सूत्र संचलन रमेश पाटील कदम यांनी केले.

