
छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये तेच स्वाभिमान व स्वातंत्र्याचे बीज ज्या आईने पेरलं ती आई म्हणजे जिजाऊसाहेब मराठ्यांचा इतिहास घडविणारे स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे भुईकोट राजवाडामध्ये आई म्हाळसाबाई आणि वडील लखुजी जाधव यांच्या घरी एक स्वतंत्र विचाराच्या महान व्यक्तिमत्त्वाचा जन्म झाला.
लहानपणापासूनच जिजाऊंना राजकारणाची गोडी, आवड व समज होती. इ.स.१६०९ मध्ये मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाह झाला. हे देखील निजामशाहीमधील प्रमुख सेनापती होते. निजामशाही आदिलशाही मोगल यांची चाकरी करण्यात शहाजीराजे यांचे जीवन गेले. जिजाबाईंना ६ मुली व २ मुले होते. जिजाबाईंनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचे शहाजी राजे यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी स्वत: शिवाजी महाराजांना घडविले. राजनीति, युद्धनीती, तलवारबाजी घोडेस्वार यामध्ये तरबेज असलेल्या या मातेने स्वत: हे प्रशिक्षण छत्रपती शिवाजी महाराजांना दिले. छत्रपती १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी पुण्याचीच जबाबदारी जिजामातेवर सोपविली. दादाजी कोंडदेव व इतर काही कर्तबगार मावळ्या समवेत जिजाऊंनी शिवाजीराजांना घेऊन पुण्याचा पुनर्विकास घडून आणला. १६३० ते १६४२ या कालखंडात जिजाऊंना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. खंबीर व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या या मातेने खचून न जाता बाल शिवाजीला सोबत घेऊन स्वराज्याचे स्वप्न फुलविले. भावनांना व नात्याला बाजूला ठेवून कर्तव्याला महत्त्व देत खंबीरपणे धैर्याने प्रत्येक प्रसंगाला सामोरे गेल्या. बहुजनातील तरुणांना शेतकर्यांना अठरापगड जाती जमातींना एकत्र करून शिवराया सारखा आदर्श राजा घडविला. जिजाबाईमुळे शिवाजी राजे हे शूरवीर, धाडसी, बलवान व शक्तिशाली योद्धा बनले. परस्त्री मातेसमान हे ब्रीदवाक्य त्यांच्या मनात कोरले. रयतेचे रक्षण कसे करायचे? व गुन्हेगाराला शासन कसे करायचे? याचे शिक्षण जिजाऊंनी शिवरायांना दिले. जिजाऊ नेहमी म्हणत असे, शिवबा मृत्यू एकदा येणारच तेव्हा आपले ध्येय साध्य करण्यासाठी लढणे वाईट नाही. आपण कधीही आत्मसन्मान गहाण ठेवून जगायचे नाही. कोणताही मुहूर्त न पाहता कार्य केले पाहिजे, ही शिकवण त्यांनी महाराजांना दिलेली. संकटा समय देव नाहीतर रयत मदतीला येईल, हा विश्वास त्यांनी निर्माण करून त्यांना रयतेचा राजा बनविले. शिवाजी नावाच्या हिर्याला पैलू पाडण्याचे काम राजमाता जिजाबाईंनी केले. मनाची शक्ती ओळखून वेळेचा सदुपयोग करून संवाद कौशल्याच्या माध्यमातून जिने हिंदवी स्वराज्याला बळकटी दिली. ती सामान्य स्त्री नव्हतीच शिवाजी महाराज हे एक जाणते राजे झाले. कारण त्यांच्या मागे एक जाणती आई उभी होती. जिजाऊ ह्या दैववादी नव्हत्या तर त्या प्रत्यक्षवादी होत्या.१६६४ मध्ये शहाजीराजांच्या निधनानंतर त्या सती गेल्या नाही तर कर्तव्य श्रेष्ठ समजून स्वत:ला स्वराज्य निर्मितीत गुंतवून घेतले.
शहाजी राजे यांच्या दरबारातील कवीने जिजाऊंच्या विषयी खूप छान लिहिले
जशी ‘चंपकेशी खुले फुलल जाई! भली शोभली जास जाया जिजाई! जिथे किर्तीचा चंबु जंबुद्वीपाला!
करी सावली माऊली मुलाला!’ एवढेच नाही तर त्यांच्या कीर्तीच्या छत्रछायेखाली जंबुद्वीपातील सज्जन लोक हे यवणाच्या जुलमाला कंटाळून आश्रयाला येत असे. जिजाऊच्या पायाशी सर्व सुख लोळत असताना त्याचा सर्वसामान्याप्रमाणे उपभोग न घेता स्वराज्याला जीवापाड जपले. जिजामातांनी पतीची हिंदवी स्वराज्य स्थापनेची इच्छा पुत्राच्या माध्यमातून पूर्ण केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी १७ जून १६७४ मध्ये त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला रायगडच्या पायथ्याशी पाचाड या गावी त्यांची समाधी आहे. जिजाऊ म्हणजे खर्या अर्थाने स्वराज्याचे विद्यापीठ होते.परस्त्री मातेसमान मानणार्या शिवरायांच्या आणि जिजाऊंच्या या भूमीमध्ये कलंकित करणार्या अनेक घटनांना आज ऊत आल आहे. बाई नाचवणारा नाही तर बाई वाचविणारा शिवबा ज्या जिजाऊने घडविला. त्या जिजाऊंच्या विचारांची आज गरज आहे. महाराष्ट्र शासनाने २००५ मध्ये व नंतर २०१५ मध्ये राजमाता जिजाऊ यांच्या नावाखाली राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण असा प्रकल्प राबविण्यात आला. या प्रमाणे प्रत्येक आईने बाळाचे संगोपन करावे हा या मागचा खरा उद्देश होता. १२ जानेवारी २०१४ रोजी आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला. शेवटी स्त्रीरक्षणासाठी तळपती तलवार जिजाऊ.. शब्दालाही मर्यादा येईल, अशी अमर्याद कर्तृत्वाची गाथा जिजाऊ.. अशी ही आमची माता जिजाऊ….
– प्रा. प्रवीण रंगराव बिरादार, इतिहास, अर्थशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंजनखेड ता.माहूर, जि. नांदेड मो ७७७३९७०५००

