
नायगाव
मेजर ध्यानचंद (हॉकीचे जादूगर) यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. त्यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात राज्य व राष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणारे नायगाव तालुक्यातील घुंगराला चे रहिवाशी दत्ता देऊबुवा भारती व सुजलेगाव येथील सुभाष भिमराव सज्जन (सुजलेगावकर) यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला आमदार बालाजी कल्याणकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार (IPS), जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, नांदेड जिल्हा सेपकटकरॉ असोसिएशनचे सचिव प्रवीण कुपटीकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, तसेच रवीकुमार बकवाड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय क्रीडा दिन सप्ताहानिमित्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी सर्व पुरस्कारार्थींना भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

