ताज्या बातम्यानांदेडनायगाव

नायगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदी सतीश लोकमनवार, गणेश नायगावकर बिनविरोध.

नायगाव : बाळासाहेब पांडे

शहराच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली असून नायगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदी सतीश लोकमनवार आणि गणेश नायगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे नगरपंचायतीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

नगरपंचायतीच्या सभागृहात स्वीकृत सदस्य निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन शुक्रवार २२ मे रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले होते. या प्रक्रियेसाठी उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. स्वीकृत सदस्यपदासाठी सतीश लोकमनवार आणि गणेश नायगावकर यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.सहायक म्हणून नगर पंचायत अधिकारी गाधाली पवार यांनी सहकार्य केले.

या वेळी सभागृहात नगराध्यक्ष अर्चना संजय चव्हाण,उपनगराध्यक्ष विजय चव्हाण,गटनेते सुधाकर शिंदे,नगरसेवक मीनाताई कल्याण,गीता जाधव,आशाताई बोईनवाड,शिवाजी कल्याण,शरद भालेराव,सुमनबाई सोनकांबळे, दयानंद भालेराव,ललिता भालेराव,विजय भालेराव,सय्यद सरवरी,विठ्ठल बेळगे, काशीबाई मदेवाड , शेख मरियांन्बी सभागृहात हजर होते.

निवड जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष करत घोषणाबाजी केली. फटाके फोडून तसेच पुष्पगुच्छ देऊन नव्याने निवड झालेल्या सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीतील पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते, नागरिक आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सतीश लोकमनवार आणि गणेश नायगावकर हे दोघेही सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय मानले जातात. शहरातील विविध विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या निवडीमुळे नगरपंचायतीच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

निवडीनंतर बोलताना दोन्ही सदस्यांनी शहर विकासाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, दिवाबत्ती यांसह नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रभावीपणे काम करून नायगाव शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.दरम्यान, आगामी काळात नायगाव नगरपंचायतीतील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत असून या बिनविरोध निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!