
नायगाव :
करुणा आणि प्रज्ञेचा महासागर असलेल्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारधारेने आज नायगाव तालुक्यातील देगाव नगरी न्हाऊन निघाली. निमित्त होते, मौजे देगाव येथील ‘तक्षशिला बुद्ध विहारा’त आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य असे तथागत गौतम बुद्ध मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे. सोमवार, दिनांक ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात ‘बुद्धम सरणम गच्छामि’च्या जयघोषाने संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला होता. वाजेगाव येथील पूज्य भंते संघपाल महाथेरो यांच्यासह १२ सदस्यीय भिक्षू संघाच्या वंदनीय उपस्थितीमुळे देगावला ‘मिनी दीक्षाभूमी’चे स्वरूप प्राप्त झाले होते.
सकाळी धम्म ध्वजारोहणाने या मंगलपर्वाची सुरुवात झाली. त्यानंतर गावातून काढण्यात आलेल्या तथागतांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले. हातात पंचशील ध्वज घेऊन श्वेतवस्त्र परिधान केलेले उपासक-उपासिका, लेकीबाळी आणि तरुणाईचा उत्साह अवर्णनीय होता. शिस्तबद्ध मिरवणुकीने आणि बुद्धांच्या जयघोषाने गावातील वातावरण भारावून टाकले होते.
या सोहळ्याचे पूज्य भंते संघपाल महाथेरो (वाजेगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत धम्म दासनैने पार पडले. त्यांच्या समवेत इतर ८ पूज्य भंतेजी आणि ४ भिक्षू उपस्थित होते. या पवित्र प्रसंगी, गावातील ज्येष्ठ आणि श्रद्धावान उपासक
भीमराव रामजी गायकवाड यांच्या हस्ते पूज्य भंतेजींना ‘चीवर दान’ (वस्त्र अर्पण) करण्यात आले. एका सामान्य उपासकाने भिक्षू संघाप्रति व्यक्त केलेला हा कृतज्ञताभाव उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे करणारा ठरला. यावेळी बोलताना भंतेजींनी, “आजच्या अशांत जगात मानवाला केवळ बुद्धांची मैत्री आणि करुणाच तारू शकते. समाजात शांतता आणि प्रज्ञा रुजवण्यासाठी विहारांची भूमिका महत्त्वाची आहे,” असे प्रतिपादन केले.
सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन
हा सोहळा केवळ एका विशिष्ट समाजाचा न राहता, तो संपूर्ण गावाचा उत्सव बनला होता. जाती-धर्माच्या भिंती ओलांडून सर्वधर्मीय ग्रामस्थांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सरपंच प्रतिनिधी संभाजी मोरे, रावसाहेब मोरे, नामदेव चिंचलवाड, पांडुरंग मोरे, रंजित मोरे, कोडावार सर, इमाम शेख आणि सुभाष मोरे व या मान्यवरांची उपस्थिती गावातील सामाजिक एकोपा आणि सलोखा अधोरेखित करणारी होती. बुद्धांचे विचार हे मानवतेचे विचार आहेत, याची प्रचिती देगाव वासियांनी आपल्या कृतीतून दिली.
हा अभुतपूर्व सोहळा यशस्वी करण्यासाठी ‘बुद्ध मूर्ती स्थापना कमिटी’ने अहोरात्र परिश्रम घेतले. यामध्ये यशवंत गायकवाड, विठ्ठल गायकवाड, चांदु गायकवाड, आनंदा गायकवाड, आनंदा गायकवाड, भीमराव रामजी गायकवाड, मिलिंद व्यकटी गायकवाड, गायकवाड परिवारा सह आणि मारोती होनसागडे यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच गावातील समस्त ज्येष्ठ नागरिक का बुध्द मुर्ती स्थापना करण्यात आलेल्या कमिटी ना गावातील तरुणांकडून संतोष चांदु गायकवाड व प्रदिप उत्तम गायकवाड यांच्या कडून सन्मान करण्यात आला समता सैनिक दलाचा भिम सैनिकांकडून मौलाचे सहकार्य करण्यात आले दुपारी १२ ते ३ या वेळेत झालेल्या भव्य अन्नदान वाटपाने या ऐतिहासिक आणि सोहळ्याची सांगता झाली.
उपस्थिती: पूज्य भंते संघपाल महाथेरो व १२ सदस्यीय भिक्षू संघ. विशेष आकर्षण: भव्य मिरवणूक आणि भीमराव रामजी गायकवाड यांच्या हस्ते चीवर दान करण्यात आले.

