ताज्या बातम्यानांदेडनायगाव

कचरा आणि सांडपाण्याने वेढले नायगाव; प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी.

नायगाव : बाळासाहेब पांडे

नायगाव शहरात नगरपंचायत अस्तित्वात असूनही स्वच्छता व मूलभूत सुविधांच्या बाबतीत गंभीर निष्काळजीपणा होत असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील विविध भागांत कचऱ्याचे ढिगारे साचलेले असून, नाल्यांचे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. कॅनाल रोडवरील नाल्यांमध्ये कचरा साचल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून दुर्गंधी, अस्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने तात्काळ उपाययोजना करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

घनकचरा व्यवस्थापन योजनेअंतर्गत दरवर्षी सुमारे १५ लाख रुपयांचा खर्च होत असल्याचा दावा केला जात असताना आणि ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत निधी उपलब्ध असूनही शहरातील स्वच्छतेची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. प्रत्यक्षात रस्ते, नाले आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचा अभाव स्पष्टपणे जाणवत आहे.

शहरातील प्रमुख भागांमध्ये नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावरून वाहत असून, भाजी मंडई परिसरातही अस्वच्छतेमुळे व्यापारी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. नाल्यांतील सांडपाण्याचे शिंतोडे उडत असल्याने आरोग्याचा धोका वाढला आहे. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

नगरपंचायतीकडून नियमित स्वच्छतेसाठी निधी खर्च होत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कामांचा ठसा दिसून येत नाही. कर्मचारी वेतन व विविध योजनांवर लाखो रुपये खर्च होत असताना नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरिकांची ठाम मागणी

शहरातील वाढत्या अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रहारचे गजानन पाटील चव्हाण यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये. शहरातील नाले तात्काळ साफ करणे, कचरा उचलण्याची नियमित व्यवस्था करणे आणि भाजी मंडईसह सर्व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी त्यांची मागणी आहे.

तसेच, ‘स्वच्छ भारत’ अभियान केवळ फलकापुरते न ठेवता प्रत्यक्षात शहर स्वच्छ करण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

नागरिकांची मुख्य मागणी :

शहरातील सर्व नाल्यांची तात्काळ साफसफाई करावी कचरा उचलण्याची नियमित व काटेकोर व्यवस्था करावी भाजी मंडई परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवावी स्वच्छता निधीचा पारदर्शक व योग्य वापर करावा नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात

नायगाव शहरातील स्वच्छतेच्या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन ठोस पावले उचलावीत, अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!