
माहूर- : जयकुमार अडकिने
एकीकडे देश ‘5जी’ आणि ‘डिजिटल क्रांती’च्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर तालुक्यात गेल्या ८ दिवसांपासून जिओ (Jio) कंपनीची सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. माहूर, वाई, दत्तमांजरी,पाचुंदा, पाणोळा व इतरत्र असलेले टॉवर फेल झाल्यामुळे संपूर्ण तालुक्यात नेटवर्कची ‘बोंबाबोंब’ सुरू असून, याचा फटका केवळ स्थानिक नागरिकांनाच नाही, तर तीर्थक्षेत्रासाठी येणाऱ्या हजारो भाविकांनाही बसत आहे.
तालुक्यातील नागरिकांमध्ये या परिस्थितीवरून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरकारने बीएसएनएल (BSNL) आणि इतर खासगी कंपन्यांना पद्धतशीरपणे बाजूला सारून जिओची मक्तेदारी निर्माण करण्यास प्रोत्साहन दिले, पण आज याच कंपनीच्या मनमानी कारभारामुळे नागरिक वेठीस धरले जात आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया उदयराज संगेवार यांनी दिली आहे. पर्यायी व्यवस्था नसल्याने नागरिक पूर्णपणे जिओवर अवलंबून आहेत, ज्याचा फायदा आता कंपनी घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
नेटवर्क नसल्यामुळे माहूर तालुक्यातील आर्थिक आणि सामाजिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत.
ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानांवरील ई-पॉस (e-POS) मशिन्स नेटवर्क अभावी चालत नसल्याने गरिबांना धान्य मिळणे कठीण झाले आहे.
ऑनलाइन बँकिंग, ई-बँकिंग आणि महा-ई-सेवा केंद्रांवरील छोटी-मोठी कामे आठवड्याभरापासून रखडली आहेत. MS-CIT, संगणक तंत्रज्ञान कोर्सेस, आणि ईतर सेवांवर परिणाम झाला आहे.
सध्या दहावी-बारावीच्या परीक्षांचा काळ सुरू असताना, शैक्षणिक साहित्य डाउनलोड करणे किंवा ऑनलाईन अभ्यास आणि शंका निरसन करणे विद्यार्थ्यांना अशक्य झाले आहे.
तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांचे हॉटेल बुकिंग, डिजिटल पेमेंट आणि संपर्क पूर्णपणे तुटला असून व्यापार्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटन व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ‘नॉट रिचेबल’चा सामना करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत कोणाशी संपर्क साधायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
संबंधित कंपनीने आणि प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन तालुक्यातील सर्व तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करावा आणि खंडित झालेली किंवा धरसोड करत विस्कटलेली संपर्क सेवा पूर्ववत करावी, अशी जोरदार मागणी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे, सेंटर हेड आदर्श किर्तने यांनी जीओ कंपनीकडे ऑनलाइन प्रणालीद्वारे केली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलनाचा इशारा व्यापारी संघटनेसह काही इतरही संघटनांनी दिला आहे.

