
नायगाव
नायगाव तालुक्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र गंगणबीड येथे आंबली-बारसी निमित्त रविवार दि. २९ मार्च ते मंगळवार दि. ३१ मार्च २०२६ या कालावधीत पालखी उत्सव, शिव-पार्वती विवाहसोहळा व चैत्र यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देवस्थान समितीने दिली.
श्रीक्षेत्र गंगणबीड हे प्राचीन व श्रद्धास्थान मानले जाणारे देवस्थान असून शिखर शिंगणापूर नंतर या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात श्रद्धा असल्याचे मानले जाते.
रविवार दि. २९ मार्च २०२६ :सायंकाळी ५ वाजता देवस्थानचे मुख्य पुजारी भागवत अप्पा स्वामी यांच्या निवासस्थानी शिव-पार्वतीची विधिवत महाभिषेक व आरती होईल.
त्यानंतर बँड-बाजा, हलगी-सनई व भजनी मंडळींच्या गजरात पालखी गावातील मुख्य मार्गाने सायंकाळी ८ वाजता हनुमान मंदिरात पोहोचेल. तेथेही महाभिषेक व आरती पार पडेल.
यानंतर रात्री ९ वाजता पालखी श्री महादेव मंदिरात आगमन करेल. येथे महारुद्राभिषेक होऊन रात्री ९.३० वाजता शिव-पार्वतीचा शुभविवाह सोहळा संपन्न होईल. त्यानंतर आरती व आकर्षक आतषबाजीचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि. ३० मार्च २०२६ :सकाळी ८ वाजता द्वादशी-बारसी निमित्त गावकऱ्यांतर्फे चैत्र-आंबलीचा भव्य महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.
दिवसभर परिसरातील भाविक काठी-कावडी घेऊन मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित राहतील.
मंगळवार दि. ३१ मार्च २०२६ :सकाळी ९ वाजता मंदिरात शिव-पार्वती पूजन होऊन पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी गावाकडे प्रस्थान करेल. हनुमान मंदिर मार्गे मुख्य पुजारी अप्पा स्वामी यांच्या निवासस्थानी विधिवत पूजा-आरतीने महोत्सवाची सांगता करण्यात येईल.
या उत्सवात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन श्रीक्षेत्र गंगणबीड ग्रामस्थ व देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.


