
नांदेड : बाळासाहेब पांडे
ग्रामीण शिक्षण, सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील पवार होटाळकर यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र भूषण सन्मान २०२५’ प्रदान करण्यात आला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे १५ मार्च रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय भव्य सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता तसेच उद्योग मंत्री नामदार मंगलप्रसाद लोढा यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, संदीप काळे लिखित पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
जगातील ७८ देशांत कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, ‘व्हीओएम इंटरनॅशनल फोरम’ आणि आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र शासन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण सन्मान प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुष्यमान भारत मिशनचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे होते. यावेळी पोलिस आयुक्त मुंबई महेश पाटील,कल्याणकर सेवा निवृत्त सनदी अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते राणा सूर्यवंशी, चंद्रमोहन पोपाला, रविकांत तुपकर,जिल्हाधिकारी अशोक काकडे,पुढारी चॅनल चे प्रसन्न जोशी, जय महाराष्ट्रचे प्रसाद काथे,लोकशाही चॅनल विशाल पाटील, व्हीओ एम राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के, व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांनी तर आभार विजय चोरडिया,संचलन आणि नियोजन संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी केले
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिवराज पाटील होटाळकर यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. शिक्षण, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यामुळे अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या असून ग्रामीण भागात सकारात्मक परिवर्तन घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. शिक्षण सभापती म्हणून कार्यरत असताना त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्या सहकार्याने जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
राजकीय क्षेत्रात सक्रिय असतानाही समाजकारणाची धुरा समर्थपणे सांभाळत ग्रामीण विकासासाठी त्यांनी केलेले कार्य विशेष ठरले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ‘महाराष्ट्र भूषण सन्मान २०२५’ प्रदान करण्यात आला.
यंदाच्या पुरस्काराचे मानकरी म्हणून अशोक काकडे-देशमुख (जिल्हाधिकारी, सांगली), सत्यपाल महाराज (राष्ट्रीय प्रबोधनकार, कीर्तनकार), सारडा कचरू हिरालाल (समाजसेवक), शिवराज पाटील पवार होटाळकर (ग्रामीण शैक्षणिक कार्य, नांदेड) आणि प्रा. डॉ. सविता गिरे पाटील (ग्रामीण मुलींच्या शिक्षणासाठी कार्य) यांचा गौरव करण्यात आला.
सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना शिवराज पाटील होटाळकर म्हणाले, “हा सन्मान माझा एकट्याचा नसून ग्रामीण भागातील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे माझे ध्येय पुढेही अधिक जोमाने सुरू राहील.”
दरम्यान, या सन्मानामुळे नांदेड व नायगाव परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध ठिकाणी होर्डिंग लावून तसेच अनेक कार्यक्रमांत सत्कार करून होटाळकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



