ताज्या बातम्यानांदेडनायगाव

वृत्तपत्र उद्योग वाचवण्यासाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ आक्रमक; १५०% जाहिरात दरवाढीसह मुख्यमंत्र्यांना निवेदन.

नायगाव : बाळासाहेब पांडे

राज्यातील वृत्तपत्र उद्योग गंभीर आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडला असून, शासकीय जाहिरात दरात किमान १५० टक्के वाढ करावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन व्हॉइस ऑफ मीडिया, नायगाव तालुका (जि. नांदेड) यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार नायगाव यांच्या मार्फत सादर करण्यात आले.

व्हॉइस ऑफ मीडिया फोरमचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले असून त्याची प्रत जिल्हाधिकारी नांदेड, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव तसेच तहसीलदार नायगाव यांना देण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सन २०१९ पासून कागद, मुद्रण साहित्य, वीज व इतर खर्चात तब्बल १५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मात्र शासकीय जाहिरात दरात त्यानुसार कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. परिणामी लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले असून अनेक प्रकाशन संस्थांवर आर्थिक गदा आली आहे.

यावेळी संघटनेने शासकीय जाहिरात दरवाढ, ई-टेंडर व शासकीय जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करणे, जाहिरातीसाठी किमान २०० चौ. से. आकार निश्चित करणे, जाहिरात देयके ३० दिवसांत अदा करणे व विलंब झाल्यास व्याज देणे, तसेच लघु व मध्यम वृत्तपत्रांना समान संधी देणे अशा महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

तसेच सर्व शासकीय जाहिराती माहिती खात्यामार्फतच देण्याची सक्ती करावी, प्रलंबित तपासण्या पूर्ण करून पात्र वृत्तपत्रांना नैसर्गिक दरवाढ लागू करावी, १० वर्षे सेवा असलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती व २० वर्षे सेवा व ५५ वर्ष वय पूर्ण पत्रकारांना पेन्शन लागू करावी, अशाही मागण्या करण्यात आल्या आहेत.

वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याने तो आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाल्यास जनतेच्या माहितीच्या अधिकारावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.

या निवेदनावर नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे, तालुका अध्यक्ष गंगाधर ढवळे, तालुका कार्याध्यक्ष बालाजी नागठाणे, शहर अध्यक्ष शिवाजी कुटूरकर, शहर कार्याध्यक्ष अरविंद शिंदे, तालुका संघटक चंद्रकांत सूर्यवंशी, डिजिटल विंग तालुका अध्यक्ष संभाजी वाघमारे, निळकंठ जाधव, सागर चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!