नायगाव 😐 बाळासाहेब पांडे
भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापनदिनानिमित्त नायगाव तालुक्यातील नरसी येथे सोमवार, दि. ६ एप्रिल २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी भाजप नेते श्रावण पाटील भिलवंडे यांच्या नरसी येथील संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमास माजी आमदार राम पाटील रातोळीकर, चेअरमन नरेंद्र चव्हाण, गोविंदराव नागेलीकर, राजेश कुंटूंरकर, श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार, गोविंदराव कुंटूंरकर, शंकर पाटील कल्याण, धनराज शिरोळे, आनंदराव बावणे, विजय होपळे, पोलीस पाटील इब्राहिम बेग पटेल, माजी सरपंच व्यंकटराव कोकणे, माजी चेअरमन मारोती पा. भिलवंडे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना चेअरमन नरेंद्र चव्हाण यांनी भविष्यातील औद्योगिक व कृषी संधींचा वेध घेतला. लवकरच कुष्णूर एमआयडीसी परिसरात हेलिपॅड प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असून, पालकांनी आपल्या मुलांना तांत्रिक शिक्षण, विशेषतः डिप्लोमा अभ्यासक्रमाकडे वळवावे, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना चव्हाण यांनी इथेनॉल उद्योगाच्या वाढत्या संधींकडे लक्ष वेधले. येत्या काळात इथेनॉलला मोठी मागणी राहणार असल्याने शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढवून या संधीचा लाभ घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.
या कार्यक्रमातून भाजपाच्या वर्धापनदिनानिमित्त स्थानिक पातळीवर विकास, उद्योग आणि शेती यांचा समन्वय साधण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला.


