ताज्या बातम्यानांदेडनायगाव

इजतगावमध्ये अवैध वाळू माफियावर पोलिसांचा मोठा प्रहार; उपविभागीय अधीक्षक श्याम पानेगावकर यांची गुरुवारी मध्यरात्री धडक कारवाई.

अंदाजे पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त; दोन बोटी उद्ध्वस्त.

नायगाव : बाळासाहेब पांडे

नायगाव तालुक्यातील इजतगाव परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर पोलिसांनी अखेर निर्णायक घाव घालत मोठी कारवाई केली. बिलोली उपविभागीय पोलिस अधीक्षक श्याम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी मध्यरात्री छापा टाकत वाळू माफियांच्या ताफ्यावर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, गोदावरी नदी पात्रातून अनेक दिवसांपासून रात्रीच्या आडोशात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू होता. विशेष म्हणजे, काही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून हा व्यवसाय चालत असल्याची चर्चा असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळू माफियांचे जाळे अधिकच बळकट झाले होते.

ही बाब गांभीर्याने घेत उपविभागीय अधीक्षक श्याम पानेगावकर यांनी विशेष पथकाची स्थापना करून नियोजनबद्ध कारवाई केली. अचानक टाकलेल्या छाप्यात ट्रॅक्टर, डंपर, टिपर अशी अनेक वाहने ताब्यात घेण्यात आली, तर नदीपात्रातील दोन बोटी बार उडवून नष्ट करण्यात आल्या. कारवाईदरम्यान काही वाहनचालक अंधाराचा फायदा घेत पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांवर व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे स्वागत केले आहे.

दरम्यान, महसूल प्रशासनाच्या मूक संमतीमुळेच हा अवैध धंदा फोफावत असल्याची चर्चा असून, या कारवाईमुळे संबंधित यंत्रणांचीही चांगलीच झोप उडाली आहे. यापूर्वीही विविध अवैध धंद्यांवर कारवाई करून ठसा उमटवणारे पानेगावकर यांनी पुन्हा एकदा कडक भूमिका घेतली आहे.

उपविभागीय अधीक्षक श्याम पानेगावकर यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की,

“अवैध वाळू उपसा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.”

कारवाईनंतर इजतगाव परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, कुंटूर ठाण्याचे सपोनी विशाल भोसले व जाधव,ठाकूर, पल्लेवाड ,कदम,मडके,आदी सर्व कर्मचारी या कामी सतर्क झाले आहेत.पुढील काही दिवस विशेष मोहीम राबवली जाणार असल्याचे संकेत पोलिस सूत्राकडून देण्यात आले आहेत. या कारवाईचा परिणाम म्हणून अंतरगावसह गोदावरी काठावरील इतर भागातील वाळू व माती माफियांची धाबे दणाणली असून, अनेक ठिकाणी अवैध उपसा थांबल्याचे चित्र दिसत आहे.

एकच सिंघम… पानेगावकर श्याम!”

राज धाबा वर झालेल्या देह विक्री रॅकेट उघडकिस आनल्या नंतर ,इजतगाव वाळू माफियावर झालेल्या कारवाईनंतर बिलोली उपविभागीय पोलिस अधीक्षक श्याम पानेगावकर यांची ‘एकच सिंघम’ म्हणून सर्वत्र चर्चा रंगली आहे.

हप्तेखोरीत अडकलेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांनाही या कारवाईने अप्रत्यक्ष चपराक बसल्याचे बोलले जात आहे.

तसेच, अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्या महसूल प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचीही या कारवाईमुळे तूर्तास फजिती झाल्याची चर्चा रंगली असून,

आता तरी कारवाईची साखळी पुढे चालू राहणार का?” असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!