कामाच्या वेळेतील लोडशेडिंग बदला; पाच गावांच्या नागरिकांचा आवाज महावितरणपर्यंतवसंत सुगावे पाटील यांचे अधीक्षक अभियंत्यांना निवेदन; विद्यार्थी, पाणीपुरवठा व शेतीच्या अडचणींचा पाढा.
नायगाव
नायगाव तालुक्यातील कृष्णूर, कहाळा (बु.), कहाळा (खु.), मांडणी व निळेगव्हाण या गावांमध्ये सुरू असलेल्या लोडशेडिंगच्या वेळेमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, कामाच्या वेळेतील वीजबंदी तातडीने बदलावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी महावितरणचे नांदेड येथील अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.सध्या या गावांमध्ये सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ६ ते १० या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जात आहे. या दोन्ही वेळा नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असल्याने विद्यार्थी, महिला, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.विशेषतः सकाळी शाळेत जाण्याच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांना तसेच सायंकाळी अभ्यासाच्या वेळेत वीज नसल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. याशिवाय वीजअभावी गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत होत असून शेतीसह इतर व्यवसायांवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे या वेळेत बदल करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वसंत सुगावे पाटील यांच्याकडे केली होती.या मागणीची दखल घेत वसंत सुगावे पाटील यांनी संबंधित गावांतील नागरिकांसह नांदेड येथे जाऊन महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांची भेट घेतली. लोडशेडिंगच्या वेळेत तातडीने बदल करण्याची मागणी करणारे निवेदन त्यांनी सादर केले. तसेच अधीक्षक अभियंता म्हणून नव्याने पदभार स्वीकारल्याबद्दल संजय खंडारे यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद हेंडगे, कृष्णूरचे सरपंच प्रशांत नादरे, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया नायगाव तालुकाध्यक्ष सटवाजी मोदलवाड, भाऊसाहेब ताटे, परमेश्वर ताटे, गोविंद ताटे, विठ्ठल डुबुकवाड, अरविंद जाधव, विठ्ठल जाधव, श्रीराम वडजे, विजय कारताळे, साईनाथ कारताळे, हरिदास शिंदे, उमाकांत शिंदे, गणेश कारताळे, बाळू चिकलवाड, सोपान हेंडगे, मारोती ढगे यांच्यासह कृष्णूर, कहाळा (बु.), कहाळा (खु.), मांडणी व निळेगव्हाण येथील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.चौकटकामाच्या वेळेतील लोडशेडिंगवर संतापसकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ६ ते १० वीजबंदी.विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम.पाणीपुरवठा विस्कळीत; शेतीची कामे ठप्प.नागरिकांच्या मागणीनंतर वसंत सुगावे पाटील यांचे महावितरणकडे निवेदन.लोडशेडिंगची वेळ बदलण्याची तातडीची मागणी.

