Uncategorized

गणेश मंडळाच्या मिरवणुकीत डीजेचाच आग्रह का? गणेशोत्सव की डीजेउत्सव ?. – जयकुमार अडकीने.

गणेश मंडळाच्या मिरवणुकीत डीजेचाच आग्रह का? गणेशोत्सव की डीजेउत्सव ? – जयकुमार अडकीने

माहूर गणपती बाप्पा मोरया! हा जयघोष ऐकला की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो भक्तिभाव, उत्साह, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम. गणेशोत्सव हा केवळ एका मूर्तीची स्थापना करून मिरवणूक काढण्याचा उत्सव नाही; तर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा, समाजप्रबोधनाचा आणि एकजुटीचा उत्सव आहे.मात्र आज प्रश्न पडता – गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू गणपती बाप्पा आहेत की डीजेचा कर्णकर्कश आवाज? गणेश मंडळाची मिरवणूक म्हटली की डीजे हवाच, असा एक विचित्र आग्रह सध्या अनेक ठिकाणी दिसून येतो. मोठमोठे स्पीकर, प्रचंड आवाज, कानठळ्या बसवणारे संगीत आणि त्यावर नाचणारी तरुणाई-हेच जणू गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण बनत चालले आहे. उत्साह असावा, आनंद असावा; पण उत्साह आणि उन्माद यामध्ये एक बारीक रेषा असते. ती ओलांडली की उत्सवाचे स्वरूप बदलते. गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली, त्यामागे केवळ धार्मिक भावना नव्हती. समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, सामाजिक जागृती करणे आणि राष्ट्रीय भावना बळकट करणे हा त्यामागचा व्यापक उद्देश होता. मग आज आपण त्या उत्सवाला केवळ मोठ्या आवाजाच्या स्पर्धेत का बदलत आहोत?कोणाचा डीजे मोठा? कोणाची साउंड सिस्टिम भारी? कोणत्या मंडळाचा आवाज सर्वाधिक?या स्पर्धेत बाप्पांचा भक्तिभाव कुठेतरी मागे पडत नाही का? मिरवणुकीत पारंपरिक ढोल-ताशा, लेझीम, भजन, गोंधळ, पोवाडे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक संदेश यांना स्थान दिले तर गणेशोत्सव अधिक अर्थपूर्ण होऊ शकतो. डीजे असू नये असे नाही; परंतु डीजे हा उत्सवाचा एक भाग असावा, उत्सवच डीजेचा होऊ नये. मोठ्या आवाजाचा परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, आजारी व्यक्ती आणि प्राणी यांच्यावरही होतो. उत्सवाचा आनंद घेताना आपल्या आनंदामुळे दुसऱ्याला त्रास होत नाही ना, याचाही विचार करणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे. आज गणेश मंडळांनी स्वतःला एक प्रश्न विचारण्याची गरज आहे—आपण बाप्पाचे भक्त आहोत की डीजेचे?आपण गणेशोत्सव साजरा करतोय की डीजेउत्सव? गणेशोत्सवाची खरी प्रतिष्ठा आवाजाच्या डेसिबलमध्ये नाही, तर आपल्या संस्कारांच्या उंचीत आहे. मिरवणुकीचा खरा थाट स्पीकरच्या आवाजात नसून भक्तांच्या मनातील श्रद्धेत आहे. एक मंडळ जर रक्तदान शिबिर घेते, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देते, वृक्षारोपण करते, सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करते आणि मिरवणुकीत सामाजिक संदेश देते- तर तो गणेशोत्सव समाजासाठी आदर्श ठरतो. पण लाखो रुपये डीजे, साउंड आणि दिखाव्यावर खर्च करून दुसऱ्या मंडळापेक्षा आपला आवाज मोठा करण्याची स्पर्धा लावली, तर आपण उत्सवाच्या मूळ उद्देशापासून दूर जात नाही का?बाप्पाला कर्णकर्कश आवाजाची गरज नाही; त्यांना निर्मळ भक्तीची गरज आहे.म्हणून यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्येक मंडळाने एक संकल्प करावा—उत्साह कमी करायचा नाही, पण उन्माद टाळायचा.परंपरा सोडायची नाही, पण विकृती स्वीकारायची नाही.मिरवणूक काढायची, पण सामाजिक भान ठेवून.आवाज करायचा, पण मर्यादेत.आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे—गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू डीजे नव्हे, तर गणपती बाप्पाच राहू द्यायचा.कारण शेवटी प्रश्न एवढाच आहे—“गणेशोत्सव साजरा करायचा आहे की डीजेउत्सव?”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button