नायगाव :
उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संघर्षमय वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्याला समाजाच्या सामूहिक सहकार्याची साथ लाभल्याचे प्रेरणादायी उदाहरण नायगाव येथे पाहायला मिळाले. हैदराबाद येथे बी.टेक.चे शिक्षण घेत असलेला श्रवण संजय मेडेवार याच्या शैक्षणिक खर्चासाठी आर्य वैश्य समाज, नायगावच्या वतीने यावर्षीही ₹२५ हजारांची आर्थिक मदत देण्यात आली.
श्रवण मेडेवार हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असून, त्याच्या गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आर्य वैश्य समाज गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शैक्षणिक मदत करीत आहे. यंदाही समाजबांधवांनी स्वयंस्फूर्तीने निधी संकलित करून ₹२५ हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला.
ही माहिती मिळताच नायगावचे उद्योजक राजेश्वर उद्धवराव मेडेवार तसेच सामाजिक कार्यकर्ते एसकेएमके (SKMK) मारोती कतूरवार यांनी पुढाकार घेत समाजबांधवांच्या सहकार्याने निधी संकलन केले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रवण मेडेवार यांच्या मातोश्रींकडे ₹२५ हजारांची रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली. यावेळी साईबाबांची मूर्ती देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना श्रवण मेडेवार यांनी समाजबांधवांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “समाजाच्या या पाठबळामुळे शिक्षण पूर्ण करण्याची प्रेरणा आणि आत्मविश्वास अधिक वाढला आहे. समाजाशी असलेले माझे नाते आणखी दृढ झाले आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मारोती कतूरवार यांनी समाजबांधवांशी संपर्क साधून निधी संकलनाची जबाबदारी पार पाडली. सर्वांच्या उपस्थितीत उद्योजक राजेश्वर मेडेवार आणि ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे यांच्या हस्ते मदतीची रक्कम श्रवण मेडेवार यांच्या मातोश्रींकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी वसंत माधवराव कवटीकवार, बालाजी रामचंद्र गादेवार, श्रीनिवास गडपल्लेवार, संजय बाबुराव गोरठेकर, साईनाथ दत्तात्रय मेडेवार, श्रीनिवास प्रतापवार, बालाजी येरावार, बालाजी कटकेलवार, संजय आरगुलवार आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईनाथ मेडेवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन बालाजी येरावार यांनी मानले.
चौकट
‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या मराठवाडा उपाध्यक्षपदी निवडीबद्दल बाळासाहेब पांडे यांचा सत्कार
आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडियाच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे (मांजरमकर) यांची निवड झाल्याबद्दल नायगावातील आर्य वैश्य समाजाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उद्योजक राजेश्वर उद्धवराव मेडेवार आणि सामाजिक कार्यकर्ते मारोती कतूरवार यांच्या पुढाकारातून शाल, श्रीफळ आणि साईबाबांची मूर्ती देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी बाळासाहेब पांडे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहिताचे प्रश्न सातत्याने मांडत लोकाभिमुख पत्रकारितेची जपलेली परंपरा कौतुकास्पद असल्याचे सांगितले. त्यांच्या पुढील सामाजिक व पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा देत उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
