
नायगाव :नायगावच्या मातीत जन्मलेल्या आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी व अथक परिश्रमाच्या जोरावर सुशांत सूर्यकांत बोंडले यांनी देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या अधिकारी निवड परीक्षेत सुशांत बोंडले यांची सहायक सेनानायक या मानाच्या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या नेत्रदीपक यशामुळे नायगाव तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शंकरनगरपासून पुणे, आंध्र प्रदेश आणि दिल्लीपर्यंतचा शैक्षणिक व संघर्षमय प्रवास करत सुशांत यांनी हे यश संपादन केले. अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी देशसेवेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन आणि ध्येयावर अढळ विश्वास ठेवत त्यांनी अखेर यशाला गवसणी घातली.अभियांत्रिकी सोडून देशसेवेची वाट!सुशांत बोंडले यांचे प्राथमिक शिक्षण शंकरनगर येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूलमध्ये झाले. त्यानंतर नांदेड येथील केंब्रिज विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून अकरावी-बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर आंध्र प्रदेशातील चित्तूर येथील आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्थेतून संगणक अभियांत्रिकीची पदवी त्यांनी मिळविली.अभियांत्रिकीची पदवी हातात असतानाही केवळ नोकरीच्या मागे न लागता देशसेवेचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. दिल्ली गाठून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. कठोर स्पर्धेत अखेर त्यांनी आपल्या गुणवत्तेची मोहोर उमटविली. वडील सूर्यकांत बोंडले हे ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी असून काका शाहिरी कलावंत तथा वारकरी संप्रदाय चे पाईक आहेत.काका च्या ववडिलांच्या सेवाभावातून ही मिळाली प्रेरणासुशांत हे नायगाव तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे तालुका सचिव सूर्यकांत जळबा बोंडले यांचे सुपुत्र आहेत. वडिलांच्या प्रशासकीय सेवाभावातून मिळालेली प्रेरणा आणि कुटुंबीयांनी दिलेले पाठबळ यामुळे सुशांत यांच्या यशाचा मार्ग अधिक भक्कम झाला.
नायगावच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी यशग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, याचा आदर्श सुशांत बोंडले यांनी घालून दिला आहे. ‘गावाकडचा विद्यार्थी देशपातळीवर झेप घेऊ शकत नाही’ हा न्यूनगंड त्यांनी आपल्या यशातून मोडून काढला आहे.सुशांत यांच्या निवडीचे वृत्त समजताच नायगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, मित्रपरिवार व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.घुंगराला ता.नायगावच्या मातीतला हा हिरा आता देशाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार असून, सुशांत बोंडले यांचे यश नायगावच्या तरुणाईला नवी दिशा देणारे ठरले आहे.

