
कुंटूर :- येथील साने गुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय कुंटूर व बहुद्देशिय प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या पंधरा वर्षापासून देण्यात येणारे वाङमय पुरस्कार साने गुरूजींच्या जयंतीदिनी जाहिर करण्यात आले. साहित्यिकांच्या लेखनप्रेरणांना प्रेरित करण्यासाठी सदरचे पुरस्कार देण्यात येतात.
सन २०२४ चा कै. सौ. इंदूमती देशमुख कुंटूरकर स्मृती वाङमय पुरस्कार-२०२४ हा लातूर येथील लेखक भारत सातपुते यांच्या मांजरा प्रकाशन लातूर यांनी प्रकाशित केलेल्या जागरण या आत्मचरित्रात्मक कादंबरीस देण्यात आला आहे. तर दुसरा कै.स्वातंत्र्यसैनिक शंकरराव केरबा पा. कदम स्मृती वाङमय पुरस्कार-२०२४ हा नांदेड येथील बालकवयित्री मीनाक्षी आचमे-चित्तरवाड यांच्या इसाप प्रकाशन नांदेड यांनी प्रकाशित केलेल्या इटुकली पिटुकली या बालकवितासंग्रहास देण्यात आला आहे. सदर पुरस्काराचे स्वरूप रोख पाच हजार रूपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शॉल, पुष्पहार असे आहे.
सदर पुरस्काराबद्दल विजेत्यांचे मनापासून अभिनंदन करण्यात येते. सदर पुरस्कारांची निवड ज्येष्ट बालसाहित्यिक डॉ.सुरेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखालील परिक्षण समितीने केली आहे. हे पुरस्कार वाचनालयाचे अध्यक्ष डॉ.बाळू दुगडूमवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश आडकिने, प्रायोजक राजेश देशमुख कुंटूरकर, मारोतराव शंकरराव कदम, परिक्षण समितीप्रमुख शिवाजी आडकिने, सद्स्य विनोद झुंजारे, सद्स्य गजानन आडकिने यांनी जाहिर केले आहेत.