
नायगाव :
नांदेड–हैदराबाद महामार्गावरील गंगणबीड फाट्याजवळ उंच डोंगरावर वसलेल्या ऐतिहासिक श्रीक्षेत्र गंगणबीड येथे महाशिवरात्री निमित्त भक्तीचा महापूर उसळला. “हर हर महादेव”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून हजारो भाविकांनी शंभू महादेवाचे दर्शन घेतले.
शासकीय नोंदीत तलबीड म्हणून उल्लेख असलेले गंगणबीड हे प्राचीन शिव-पार्वती (हरि-हर) एकात्मतेचे पवित्र स्थान मानले जाते. उंच शिखरावरील हे महादेव मंदिर “प्रति शिखर शिंगणापूर” म्हणूनही ओळखले जाते. नरसी-नायगावपासून सुमारे ७ कि.मी. आणि नांदेडपासून सुमारे ४० कि.मी. अंतरावर असलेल्या या तीर्थक्षेत्रावर महाशिवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविकांनी हजेरी लावली.
गंगणबीड, राणसुगाव व निळेगव्हाण परिसरातील भाविकांसह मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतूनही भक्त मोठ्या संख्येने येथे दाखल झाले. गर्दीचा विचार करून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामस्थ व मंदिर समितीच्या वतीने दर्शन व्यवस्थेची चोख व्यवस्था करण्यात आली.
येथील शंभू महादेवाची मूर्ती स्वयंभू असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. शिवलिंगावर शिव-पार्वती एकत्र विराजमान असल्याचे मानले जाते, तर काहींच्या मते येथे हरि-हर एकत्वाचे प्रतीक आहे. मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणी महादेव म्हणूनही या क्षेत्राची ख्याती आहे. निसर्गरम्य माळरानावरील हे मंदिर भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरते.
महाशिवरात्रीनिमित्त महाभिषेक, शिवलीलामृत पारायण, भजन, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हरि-हर परंपरेनुसार येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे कीर्तन पार पडले, तर बुधवारी (आज) ह.भ.प. सचिन महाराज ढोले (छत्रपती संभाजीनगर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
दरम्यान, कोलंबी मठाचे मठाधीपती यधूबन महाराज कोलंबीकर, माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव खतगावकर, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान लंगडापुरे, माणिकराव लोहगावे, श्रीनिवास चव्हाण, विजय चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे, मनोज सावकार, वसंत माने यांच्यासह अनेक मान्यवरांनी महादेवाचे दर्शन घेतले.
या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ व मंदिर देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

