
नायगाव :
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेतर्फे येत्या १० डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा धडकणार असून, नायगाव तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पळसगावचे पोलीस पाटील संतोष सुर्यवंशी यांनी केले आहे.
या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील करणार आहेत. पोलीस पाटील सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यासह मानधनात दरवर्षी १० टक्के वाढ, प्रवास व स्टेशनरी भत्त्यासाठी दरमहा ३ हजार रुपये, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन किंवा एकरकमी २५ लाखांची तरतूद, कर्तव्यावर मृत्यू झाल्यास ५० लाखांचे सुरक्षा कवच, ग्राम पोलीस अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्ती व काटेकोर अंमलबजावणी, पोलीस पाटील व त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य विमा कवच, पदाचे नूतनीकरण रद्द करून कायमस्वरूपी नियुक्ती आणि २०१२ ते २०१६ मधील प्रलंबित प्रवास भत्त्याचे तातडीने वितरण अशा सर्व महत्त्वाच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जात आहे.
गावपातळीवरील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या पोलीस पाटलांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, या उद्देशाने संघटना एकजुटीचे प्रदर्शन करणार आहे.
न्याय व हक्कांसाठी आपण सर्वांनी नागपूर मोर्च्यात उपस्थित राहून ताकद दाखवावी,असे आवाहन पोलीस पाटील संतोष सुर्यवंशी यांनी केले आहे.

