
नायगाव:- बाळासाहेब पांडे
नायगाव तालुक्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या बरबडा गावातील प्रशासनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. विशेषतः वार्ड क्रमांक २ मधील दलित वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तुटलेली पाईपलाइन, खचलेले रस्ते आणि बंद झालेली घंटागाडी यामुळे ग्रामस्थांच्या जीवनात आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा टाकला आहे.
ग्रामपंचायतीकडे दरवर्षी पंधराव्या वित्त आयोगातून, जिल्हा परिषदेमार्फत व केंद्र शासनाच्या विविध योजनांतून कोट्यवधी रुपयांचा निधी येतो. शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता आदी विकासकामांसाठी आराखडे कागदोपत्री तयार करून सादर केले जातात. मात्र प्रत्यक्षात, हा निधी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांच्या संगनमताने इतरत्र वळवून “चांगभलं” करण्यात येतो, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
तुटलेल्या पाईपलाइनमुळे गलिच्छ पाणी रस्त्यावर वाहत असून शाळेतील विद्यार्थ्यांना यामुळे दुखापतीच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यांवर खड्डे, नाल्यांतून वाहणारे सांडपाणी आणि बंद झालेली कचरा घंटागाडी – ही सर्व संकटं नागरिकांच्या नशिबी आली आहेत.ग्रामपंचायत कार्यालय मात्र या गंभीर समस्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष करत असून, नागरिकांचे केवळ कर आणि खिशभरू कामे करण्यापुरतेच त्यांचे कामकाज मर्यादित असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.
बरबडा येथील नागरिकांनी विशेषतः दलित वस्तीत राहणाऱ्या लोकांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, बंद असलेली कचरा गाडी पुन्हा सुरू करावी आणि रस्त्यांची व पाणीपुरवठा यंत्रणेची त्वरित दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

