
शंकर पा.अडकिने
संकटातून संधी आणि संधिचे सोन करणारे किमयागार : वसंतरावजी चव्हाण ; प्रा.डॉ.गोविंद राजाराम परडे.
: कांही मानसे सूर्यासारखी असतात. त्यांच्या अस्तीत्वाने सारा परिसर तेजोमय होवून जातो. नायगाव व नायगाव परिसर ज्याच्या अस्तीत्वाने प्रकाशमय झाला. ते म्हणजे अमृतपुत्र कै. बळवंतरावजी चव्हाण व बळवंत पुत्र लोकनेते स्व. वसंतरावजी चव्हाण होत. स्वतःला शिक्षण घेता आलं नाही म्हणून सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे या हेतूने बळवंतराव चव्हाण यांनी 1959 मध्ये त्यांच्या समकालीन मंडळीना गोळा करून “नायगाव एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि नायगावमध्ये शिक्षणाची बाग फुलवली या बागेला खतपाणी घाणून बाग वाढवण्याचा आणि फुलवण्याचा वारसा स्व.वसंतराव चव्हाण यांनी यशस्वीपणे चालवला. ही पेटवलेली ज्ञानज्योत अधिक प्रकाशमान करण्याचे कार्य स्व. वसंतराव चव्हाण साहेब यांनी केले. वसंतरावजी चव्हाण साहेबाना मी 1992 पासून ओळखतो सुरवातीला जनता (ज्यु.) कॉलेज व नंतर शरदचंद्र महाविद्यालय नायगाव (बा.) येथे विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत असताना साहेबांना जवळून पाहता आल, साहेब कार्यकर्त्यांशी जेवढे जवळून आपुलकीने बोलायचे तसेच विद्यार्थ्यांशी ते आपुलकीने वागत असत. नंतर मी पदवीत्तर शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून पूर्ण केल्यानंतर 1999 पासून शरदचंद्र महाविद्यालयातच अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो. काही तांत्रिक अडचणी मुळे मला अनेक वर्ष सी. एच. बी. वर काम करावे लागले परंतु शेवटी मला पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी साहेबांनी मिळवून दिलीच.तसा साहेबांचा माझा संबध संस्थेचा एक विद्यार्थी, एक कर्मचारी, एक पालक आणि राजकारणातील सक्रिय कार्यकर्ता म्हणून आलेला आहे. माणूस फक्त नशिबाने मोठा होत नाही तर तो स्वतःच्या कर्तृत्वाने परिश्रमाने आणि चरित्राने मोठा होत असतो. मोठेपणा मिळवण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात. साहेबांबद्दल लिहायचे म्हटले तर लेखणीला आभाळ कमी पडेल म्हणून साहेबांच्या राजकीय जीवनात जी संकटे आली त्या संकटात संधी शोधून संधीच सोने कसे केले याचा आढावा माझ्या कुवतीप्रमाने मी घेत आहे. साहेब 1978 पासून नायगावचे सरपंच म्हणून कार्य करीत असताना 1992 ते 1997 या काळात जिल्हा परिषद सदस्य म्हणून ही कार्य केले आहे. मात्र 1997 मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत नायगाव गट हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाला तर नायगाव पंचायत समिती गट हा महिलांसाठी राखीव झाला. यावेळी नायगाव गटासाठी माधवरावजी बेळगे व नायगाव गणासाठी सौ सुंदरताई चव्हाण व देगाव गणासाठी सौ.विमलताई वाघमारे यांच्यासाठी काँग्रेसकडून तिकिटाची मागणी केली परंतु ती मिळाली नाही तेव्हा साहेबांनी अपक्ष निवडणूक लढवून सर्वांना निवडून आणले आणि बिलोली पंचायत समितीच्या पहिल्या सभापतीपदी सौ सुंदरताई चव्हाण यांना विराजमान केले बिलोली पंचायत समितीमध्ये 20 सदस्य होते. काँग्रेस 9, भाजप 3, सेना 4 आणि अपक्ष 3 अशा परिस्थितीमध्ये साहेबांनी सभापती पद खेचून आणले. १९९८ मध्ये बिलोली विधान सभेच्या पोट निवडणुकीत कै.बळवंतराव चव्हाण आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र १९९९ मध्ये शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना केली आणि साहेब सर्वप्रथम राष्ट्रवादी सोबत जाणारे आमदार ठरले. १९९९ च्या निवडणुकीत बिलोली मतदारसंघ राष्ट्रवादीच्या आघाडीत असलेल्या जनता दलाला सोडण्यात आला होता. अशावेळी पोटनिवडणुकीत गंगारामजी ठक्करवाड यांना बळवंतरावजी चव्हाण साहेबांनी पराभूत केले होते. परंतु यावेळी गंगारामजी ठक्करवाड यांना निवडून आणण्याची जबाबदारी वसंतरावजी चव्हाण साहेबांवर टाकण्यात आली आणि साहेबांनी ती पार पाडली. याचे बक्षीस म्हणून २००२ मध्ये साहेब जि. प. सदस्य म्हणून निवडून येताच पवार साहेबांनी वसंतरावजी चव्हाण साहेबांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी दिली. साहेब आमदार झाले आणि नायगाव व परिसराच्या विकासाला बहर येऊ लागला. सन २००९ मध्ये मतदार संघाची पुनर्रचना होवून नायगाव मतदार संघ अस्तीत्वात आला, मतदार संघात राष्ट्रवादी पक्षाचे वसंतरावजी चव्हाण, बापूसाहेब गोरठेकर आणि गंगाधररावजी कुंटुरकर हे तीन दिग्गज नेते होते. या वेळी तिकीट साहेबांना न मिळता गोरठेकर साहेबांना देण्यात आले. या वेळी साहेबांनी कार्यकर्त्यांच्या विचाराने अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आणि साहेबांनी निवडणूक जिंकुन इतिहास घडवला, प्रचार काळात काँग्रेस कार्यकर्त्यांना दिलेल्या शब्दानुसार साहेब काँग्रेस सोबत गेले. कारण साहेब शब्दाला जगणारे नेते होते. 2014 मध्ये देशात मोदी लाट होती महाराष्ट्रातही धनगर समाजाचे एस.टी. आरक्षण लढा चालू होता. देशात आणि केंद्रात युतीचे सरकार आल. परंतु नायगाव मतदार संघात वसंतरावजी चव्हाण चांगल्या मताधिक्याने निवडून आले आणि नायगावचे दुसऱ्यांदा आमदार झाले. 2019 च्या निवडणुकीत सर्व विरोधी मंडळीनी एकत्र येवून काम केल. आणि साहेबांचा पराभव झाला. पण साहेब स्वतः ही खचले नाहीत आणि कार्यकर्त्यांना खचू दिले नाहीत. आपले समाज कार्य जोमाने चालू ठेवले. 2019 ला अनेक घडामोडी घडून महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आली आणि साहेबांना जनतेचे कार्य करण्यास बळ मिळाले. या काळात साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव चे सभापती झाले. त्यांच्या काळात मार्केट कमिटीचे भव्य गोदाम बांधले. आणि मांजरम येथील उपबाजारात पेट्रोलपंप उभारला गेला. एप्रिल २०२१ मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागली आणि साहेब नायगाव तालुक्यातून उभे राहिले. त्यांच्या विरुद्ध गंगाधररावजी कुंटुरकर साहेब होते. या निवडणुकीत साहेब विजयी झाले. परंतु निवडणूक निकालाच्या दिवशी गंगाधररावजी कुंटुरकर साहेबांचे निधन झाले. वसंतराव चव्हाण साहेब कुठला ही आनंदउत्सव साजरा न करता दुखवटा पाळला. साहेब नंतर नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष झाले. सन २०२३- २४ हे बँकेचे शताब्दी वर्ष होते. त्याचा भव्य कार्यक्रम कुसुम लॉनस नांदेड येथे झाला. साहेबांच्या काळात बँकेचे ए. टी. ए. कार्ड सुविधा निर्माण केली गेली आणि या वर्षी बँकेचा नफा ५० कोटी झाला होता हे विशेष आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड मोठा भूकंप झाला. देशाचे माजी गृहमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. शंकररावजी चव्हाण यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री काँग्रेस चे बडे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी काँग्रेस सोडून भाजपा मध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्याचा सर्वात अधिक परिणाम नांदेड जिल्ह्यावर होणार होता. अशावेळी साहेब अनेक दिवस स्थिर होते त्यांना काँग्रेस सोडायची नव्हती. या वेळी काँग्रेसवर आलेले संकट स्वतःचे समजून साहेब या संकटाच संधीत रुपांतर केले आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. साहेबांनी निवडणूक लढवली ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली आणि साहेबांचा ऐतिहासिक विजय झाला. साहेबांची चर्चा महाराष्ट्रातच नाही तर संपुर्ण भारतभर झाली. साहेबांचा विजय मोदी – शहाना ही चक्रावून टाकणारा होता. कश्तियाँ उन्ही की डूबती है, जिनके ईमान डगमगाते हैं। जिनके दिल में नेकी होती है, उनके आगे मंजिले भी सर झुकाती है। साहेबांच्या जीवनात ज्या ज्या वेळी संकटे आली त्या त्या वेळी साहेबांनी संधी शोधली आणि त्या संधीचे सोने केले आणि यशोशिखरावर विराजमान झाले. साहेबांची तब्बेत फारशी चांगली नव्हती परंतु साहेब जनतेच्या कार्यात शेवटपर्यंत सक्रिय राहिले. ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात नांदेड येथे काँग्रेस च्या विभागीय संवाद मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यात महाराष्ट्रातील सर्व काँग्रेस चे प्रमुख नेते उपस्थित होते. पण या मेळाव्याच्या केंद्रस्थानी लक्षवेधून घेत होते लोकनेते खा. वसंतरावजी चव्हाण साहेब. त्याचे जीवन म्हणजे “कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती” ही उक्ती सार्थ करणारे ठरले. या धावपळीत १३ ऑगस्ट रोजी साहेबांची तब्बेत बिघडली साहेबाना प्रथम नांदेड नंतर हैदराबाद येथे ऍडमिट करण्यात आले. १५ ऑगस्ट हा साहेबांचा वाढदिवस. नायगाव व संपूर्ण नांदेड जिल्हा साहेबांच्या वाढदिवसाच्या तयारीत असताना. साहेबांसाठी ईश्वराकडे प्रार्थना करीत होता. हैदराबाद ला साहेबांना पाहण्यासाठी कार्यकर्त्यांची नेत्यांची रांग लागली होती. मी ही काही मित्रासह २३ ऑगस्ट ला हैदराबाद ला जाऊन आलो. साहेब परत येतील याची सर्वांना आशा होती. परंतु नियतीच्या मनात काहितरी वेगळेच होते. दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी विचाराचे आणि कर्तृत्वाचे वादळ प्रेम आणि आपुलकीचे वृक्ष स्नेह आणि भावनांचा तलाव सत्य आणि संस्काराचा सह्याद्री संघर्षाची धगधगती मशाल लोकनेते वसंतरावजी चव्हाण साहेब यांची प्राणज्योत मावळली आणि नायगाव परिसर व नांदेड जिल्ह्यावर दुःखाची छाया पसरली. दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांच्या अंत्यसंस्काराला जनसागर उसळला. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत साहेबांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
साहेब संघर्षातही सन्मानाने जगले. त्याच सन्मानाने मृत्यूला ही सामोरे गेले. संघर्षातून अनेक उच्चपदाना गवसणी घालणारा हा तळपता सूर्य मावळला. याविषयी असे म्हणावे वाटते. सूर्य जरी मावळला तरी संधी प्रकाश हा रेंगाळतच असतो. साहेबांचा सहवास जरी बंद झाला तरी त्यांच्या कीर्तीचा सुगंध दरवळत असतो. साहेब अजूनही होतो भास तुम्ही आहात जवळपास.
- शांती लाभो तुमच्या आत्म्यास ही प्रार्थना परमेश्वरास. साहेबांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र युवानेते रवींद्र चव्हाण यांना आपल्या संस्कार आणि पुण्याईने जनतेने आशीर्वाद देऊन खासदार बनवून आपले अधुरे काम पूर्ण करण्यासाठी दिल्लीला पाठवले आणि खऱ्या अर्थाने आपणास श्रद्धांजली वाहिली. खा. रविंद्र चव्हाण सुद्धा आपला वारसा चालवून नावाप्रमाणेच नायगाव परिसर नांदेड जिल्हा आणि महाराष्ट्राच्या राजकारणात प्रकाशमान कार्य करतील याची खात्री वाटते. प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त साहेबांना भावपूर्ण विनम्र अभिवादन प्रा. डॉ. गोविंद राजाराम परेड अर्थशास्त्र विभागप्रमुख शरदचंद्र महाविद्यालय नायगाव सरपंच प्र. ग्रामपंचायत परडवाडी ता. नायगाव. मा. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कुंटूर. मो. न : 9922724196

