ताज्या बातम्यानांदेड

स्मृतिगंध : २७ वर्षांनंतरचा शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा.

नांदेड बाळासाहेब पांडे

नांदेडच्या गुजराती हायस्कूलच्या १९९८ बॅचचा स्नेहमेळावा दिनांक २९ जून २०२५ रोजी अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. तब्बल २७ वर्षांनंतर एकत्र आलेल्या शाळासोबत्यांनी पुन्हा एकदा शाळेच्या कट्ट्यावरच्या गप्पा, शिक्षकांचे धडे, आणि मैत्रीच्या गाठी नव्याने घट्ट केल्या. स्नेहमेळाव्याची कल्पना नांदेडमध्ये स्थायिक झालेल्या काही मित्रांनी गप्पांदरम्यान मांडली आणि तिला तातडीने मूर्त रूप देण्याचं ठरवलं. “शाळेतील मित्रांशी पुन्हा भेट व्हावी, शिक्षकांना भेटून परत एकदा विद्यार्थी बनावं” या हेतूनं कामाला सुरुवात झाली. सर्व मित्र-मैत्रिणींना संपर्क करून एक WhatsApp ग्रुप तयार करण्यात आला आणि सर्वाना आवर्जून येण्याचे सांगितले.

या स्नेहमेळाव्याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे शिक्षकांसाठी खास आमंत्रणपत्रिका तयार करून माजी विध्यार्थ्यानी त्या स्वतः शिक्षकांच्या घरी जाऊन दिल्या गेल्या. शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुमठाणकर सरांना ह्या कार्यक्रमासाठी निमंत्रण व रीतसर लेखी विनंती करून हा कार्यक्रम शाळेतच करण्याची परवानगी मागितली आणि ती आनंदाने दिली. यावेळी जुन्या आठवणींचं एक वेगळंच पर्व उलगडलं. कार्यक्रमासाठी शाळेची भव्य सजावट करण्यात आली. स्वागतासाठी रंगीत बॅनर, ‘सेल्फी पॉईंट’, स्टेज डेकोरेशन यांसारखी व्यवस्था सजवली गेली. पुण्यातून निघालेल्या मित्रांनी एकत्र ट्रेन प्रवास केला. या प्रवासात झालेला हास्यविनोद आणि गप्पांची रेलचेल म्हणजे स्नेहमेळाव्याची पहिली झलकच होती. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी हॉटेलमध्ये एकत्र स्नेहभोजन ठेवलं होतं. एकमेकांना २७ वर्षांनंतर ओळखणं, नाव लक्षात ठेवणं आणि आठवणी सांगताना झालेला हशा, हे सगळं आनंददायी होतं.

मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी शाळेत सकाळी बँड पथकाच्या वादनात सर्व शिक्षकांचं आणि मित्रमंडळींचं शाळेत स्वागत करण्यात आलं. ह्या कार्यक्रमाला एल. के. कुलकर्णी सर, डी. एस. कुलकर्णी सर, डी. आर. कुलकर्णी सर, विभा थापे मॅडम, वंदना मॅडम , चंद्रकला कुलकर्णी मॅडम , गायकवाड मॅडम , बंडे टीचर, केसराळे मॅडम , सीमा जोशी टीचर, ज्योती शिंदे मॅडम , पद्मजा जोशी मॅडम , मेघा जोशी टीचर, विद्या मुळे मॅडम हे शिक्षकवृंद तसेच शाळेच्या समितीचे पदाधिकारी श्री. केतनभाई नागडा (अध्यक्ष), श्री. दीपकभाई दामा (सचिव), श्री. शांतिलालभाई पटेल (कोषाध्यक्ष) उपस्थित होते. यानंतर सर्व उपस्थित शिक्षक, समितीचे पदाधिकारी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ आणि फेटा घालून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी काही दिवंगत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिक्षकांनी आपले विचार बोलून जुन्या आठवणींना उजाळा दिला, आणि त्यांनी केलेले संस्कार पुढील पिढी पर्यंत पोहंचल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने प्रयोगशाळेत उपयोगी पडेल असे सूक्ष्मदर्शक शाळेला भेट दिले त्याबद्दल शाळेच्या उपमुख्याध्यापिका मेघा जोशी मॅडम यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचलन रेणू येवतीकर आणि कमलेश राठोड यांनी केले. यानंतर आम्ही सर्वांनी आपल्या जुन्या दहावीच्या वर्गात जाऊन वेळ घालवला. काही क्षणासाठी सगळे जण पुन्हा विद्यार्थीसारखेच वागत होते. तोच फळा, तेच बाक, आणि खिडकीतून दिसणारे दृश्य – सर्व काही पुन्हा अनुभवणं हे अविस्मरणीय होतं.

कार्यक्रमाचा दुसरा टप्पा दुपारी जवळच एका हॉटेलमध्ये सुरू झाला. केक कापणे, जुने फोटो, धमाल खेळ, डान्स, आणि भरपूर फोटोसेशन! सगळ्यांनी जणू २७ वर्षांचा काळच मागे टाकला होता. या कार्यक्रमासाठी रवी बर्डे आणि ह्रिषीकेश कुलकर्णी यांनी खूप मेहनत घेतली तसेच नांदेडमधील स्थायिक इतर माजी विद्यार्थी उमेश निलावार, दीपक मुथा,सचिन बंबरुळे, सौ यशश्री सांगारेड्डीकर- जोशी, सौ.भक्ती भोरे-नांदेडकर,सौ पल्लवी पाठक-मदनूरकर यांनी तितकीच मोलाची साथ दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मित्र-मैत्रिणींनी एकमेकांना निरोप देताना वातावरणात भावनांचा भर ओसंडून वाहत होता. “पुन्हा लवकरच भेटू!” या वचनाने स्नेहमेळाव्याची सांगता झाली. “स्मृतिगंध” हा स्नेहमेळावा शाळेतील जुन्या आणि नव्या स्मृतींचा गंध पुढील अनेक वर्ष आठवणींच्या रूपांनी निश्चितच आमच्या आयुष्यात दरवळत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!