
नायगाव : बाळासाहेब पांडे
नायगाव तालुक्यातील बरबडा येथील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर कुंटूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत ४५ लाख रुपयांच्या तीन बोटी जप्त करून त्या जिलेटिनच्या साहाय्याने नष्ट केल्या. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे मोकाट सुटलेल्या रेती माफियांना पोलिसांच्या या कारवाईमुळे जबर दणका बसला असून, महसूल यंत्रणा मात्र या प्रकरणात संपूर्णपणे तोंडघशी पडली आहे.
सपोनि विशाल भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे टाकळी, बरबडा, वजीरगाव परिसरातील गोदावरी पात्रात अचानक धाड टाकली. अवैध रेती उपशासाठी वापरल्या जात असलेल्या तीन फायबर बोटी त्यांनी ताब्यात घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गडगा येथून परवानाधारक स्फोटकांची मदत घेऊन बोटी आणि अवैध उपशाचे साहित्य उदध्वस्त करण्यात आले.
या बोटांची एकूण अंदाजे किंमत ४५ लाख रुपये असून, बोटींविरोधातील कारवाईने परिसरातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे, या भागातून सुरू असलेल्या अवैध उपशाची माहिती महसूल विभागाला असूनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या सातत्याने होत असलेल्या तक्रारी असूनही महसूल विभागाने डोळेझाकच केली. मात्र, पोलिसांच्या कठोर कृतीमुळे अखेर या माफियांवर लगाम बसला. या प्रकरणातून राजकीय पाठबळ असलेल्या माफियांच्या मुसक्या आवळण्याचे संकेतही मिळत आहेत.
या कारवाईचे मुख्य वैशिष्ट्ये:, ३ फायबर बोटी जप्त व नष्ट अंदाजे किंमत – ₹४५ लाख, अवैध रेती उपशावरील थेट कारवाई ,महसूल विभागाचा निष्क्रियपणा उघड ;स्थानिकांचा पोलिस दलाला पाठिंबा , सपोनि विशाल भोसले यांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, अजूनही अशाच अवैध धंद्यांवर कठोर कारवाई होण्याची मागणी जनतेकडून होत आहे.

