माहूर – सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर माहूर गडावर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री रेणुका देवी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. परंतु, मंदिर संस्थानचे व्यवस्थापन कोलमडल्यामुळे भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
देवस्थानकडे धर्मशाळा नसल्यामुळे भाविकांना खासगी लॉज व रूमचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी त्यांना महागडे दर मोजावे लागत आहेत. पावसाळी वातावरणात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आसरा न मिळाल्याने गैरसोयी अधिकच वाढल्या आहेत.
देणगीसाठी देखील भाविकांना तासन् तास लांबच लांब रांगेत थांबावे लागत आहे. महावस्त्राच्या व्यवस्थापनाकडे संस्थान पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याने भविष्यात कोल्हापूरप्रमाणेच महावस्त्र घोटाळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्वतंत्र अभिषेक सभामंडप नसल्यामुळे
पुजारी वर्गाकडूनही नाराजीचे वातावरण आहे. अभिषेकासाठी आलेल्या भाविकांना पुजाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे सभामंडपात चार ते पाच वेळा प्रवेश दिला जात आहे, तर इतर भाविकांना सुलभ दर्शन घेणे कठीण झाले आहे.
सुमारे 70 कायमस्वरूपी व 30 उत्सव कर्मचारी असूनही मंदिर परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पाहायला मिळते आहे. गडावर पार्किंगची मोठी समस्या असल्याने वाहतूक कोंडी व गोंधळ निर्माण होत असून भाविकांचे हाल होत आहेत.
या सर्व गोंधळाकडे दुर्लक्ष होत असल्याने भाविकांनी लेखी पत्राद्वारे मंदिरात राजपत्रित अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली आहे. तरीदेखील शासकीय विश्वस्त मंडळाकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, अशी खंत व्यक्त होत आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ‘स्काय वाॅक प्रकल्पा’अंतर्गत काही विकासकामे सुरू असली तरी त्याचा वेग कासवगतीने आहे. त्यामुळे विकासकामे अर्धवट अवस्थेत असून गडावर आलेल्या भाविकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
भाविकांच्या सुविधा, स्वच्छता, निवास व पार्किंगची सोय याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे असून अन्यथा माहूर गडावरील परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

