
नायगाव बाळासाहेब पांडे
गडगा परिसरातील कोपरा पाटी व आलू वडगाव तांडा येथील दोन पोल्ट्री फॉर्ममधून पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नरसी ते मुखेड या राज्य महामार्गालगतच हे फॉर्म असल्याने महामार्गावरून प्रवास करणारे हजारो वाहनधारक तसेच आसपासच्या वीस ते पंचवीस गावातील नागरिक नाहक त्रास सहन करत आहेत.
कोंबड्यांच्या विष्ठेमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, माशांच्या उपद्रवामुळे घराघरात अन्नग्रहण करणे कठीण झाले आहे. लहान मुलांमध्ये आजार वाढले असून वृद्धांचे आरोग्य खालावत आहे. जनावरांचे दूध उत्पादन कमी झाले असून साथीच्या रोगराईचा धोका वाढत चालला आहे. विशेषतः पावसाळ्यात ढगाळ वातावरणात ही दुर्गंधी अधिकच असह्य झाली आहे.
प्रदूषण विभागाकडून ढिम्म
या गंभीर समस्येबाबत नागरिकांनी अनेकदा जिल्हा प्रदूषण विभागाकडे तक्रारी व निवेदने दिली असली तरी कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. कागदोपत्री पाहणी करून हात ओले करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे पोल्ट्री व्यावसायिकांना पाठबळ मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. आंध्र प्रदेशातील उद्योगपतीच्या मनमानी कारभारामुळे परिसरातील जनतेला गेल्या दोन दशकांपासून आर्थिक, मानसिक व आरोग्यविषयक यातना सहन कराव्या लागत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांकडे बंद करण्याची मागणी
जयसूर्या पोल्ट्री फॉर्म प्रा. लि. या कंपनीमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करावी व नियमबाह्य कारभार करणाऱ्या पोल्ट्री फॉर्मना तत्काळ बंद करावे, अशी ठाम मागणी नायगाव तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात ; दुर्गंधीमुळे जेवण करणे अशक्य ; लहान मुले व वृद्ध आजारी पडत आहेत ;जनावरांचे दूध उत्पादन घटले
साथीच्या रोगराईचा धोका वाढला ; झोपेचा अभाव व मानसिक त्रास

