ताज्या बातम्यानांदेडनायगाव

आरक्षणाच्या लढ्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा एल्गार; गावागावातून ‘चलो मुंबई’चा गजर ; नायगाव तालुका एकदिलाने एकवटला,पुन्हा एकदा तरुण पेटून उठला.

आरक्षणाच्या लढ्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा एल्गार; गावागावातून ‘चलो मुंबई’चा गजर ; नायगाव तालुका एकदिलाने एकवटला,पुन्हा एकदा तरुण पेटून उठला.

नायगाव बाळासाहेब पांडे
दि. २८ऑगस्ट २५ –
मराठा आरक्षणाच्या निर्णायक लढ्यासाठी नायगाव तालुका अक्षरशः पेटून उठला असून गावोगावांतून मराठा समाजबांधव *‘चलो मुंबई’*च्या घोषणांसह मोठ्या संख्येने मार्गस्थ झाले आहेत. या आंदोलनाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे मराठा बांधवांसोबत मुस्लिम समाज बांधवही हिरीरीने सहभागी होत आहेत. हिंदू-मुस्लिम एकतेचा हा अनोखा संगम आंदोलनाला अधिक बळकटी देत असून, आरक्षणाच्या लढ्याला ऐतिहासिक वळण मिळाले आहे.                 गावातून निघताना ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘चलो मुंबई’ आणि ‘मराठा आरक्षण हक्क आमचा’च्या गगनभेदी घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द स्पष्ट दिसत होती. हा लढा यशस्वी झाल्याशिवाय परतायचे नाही, असा पोलादी निर्धार प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात झळकत होता.                  गावोगावांतून निघाले जत्थे                                        नायगांव तालुक्यातील देगाव, पळसगाव, गंगनबिड, मरवाळी, खंडगाव, होटाळा,मांजरम,बरबडा,कुंटूर,नायगाव,परिसरातील गावांसह संपूर्ण तालुक्यातून मराठा समाजाचे गट मुंबईकडे रवाना झाले आहेत. प्रत्येक गावातून २० ते २५ कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले असून, त्यांनी मुक्कामासाठी लागणारे धान्य, गॅस, पीठ आणि अन्य साहित्य सोबत घेतले आहे. त्यामुळे प्रशासनावर कोणताही भार न टाकता कार्यकर्ते आत्मनिर्भरतेने या लढ्यात झोकून देत आहेत.  विशेषता मांजरम सह अन्य काही गावातून मराठा समाज बांधवां सोबत मुस्लिम समाजातील कार्यकर्तेही सामील झाले असून, समाजात ऐक्याचे आणि बंधुभावाचे उत्तम उदाहरण या ठिकाणी दिसून आले.                                              हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश.                                    मुस्लिम समाज बांधवांनी गावोगावांतून मराठा आंदोलनाला पाठिंबा देत जत्थ्यांसोबत मुंबईकडे कूच केल्याने संपूर्ण तालुक्यात सामाजिक ऐक्याचा संदेश पोहोचला आहे. “आरक्षण ही केवळ मराठा समाजाची नव्हे तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठीची लढाई आहे,” असा ठाम संदेश देत मुस्लिम बांधवांनी सहभागाची नोंद करून आंदोलनात नवी ऊर्जा निर्माण केली आहे.                                      तालुक्यात उत्साह व एकजूट.                                         या अभूतपूर्व आंदोलनामुळे संपूर्ण तालुक्यात एकजूट, बंधुभाव आणि उत्साहाचे वातावरण आहे. गावोगावांतून निघणारे हे जत्थे मराठा समाजाच्या मागण्यांसाठीची तीव्र भावना आणि समाजातील ऐक्याचे प्रतिक बनले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला नायगाव तालुक्यातून मिळालेला व्यापक प्रतिसाद आरक्षणाच्या लढ्याला अधिक धार देत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!