
नायगाव : बाळासाहेब पांडे
नायगाव (खै.) तालुक्यातील रातोळी येथे अज्ञात व्यक्तींनी शेतातील हरभऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत सुमारे दोन एकर क्षेत्रातील हरभऱ्याचा ढिगारा जळून खाक झाला असून अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रातोळी येथील सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन अंकुश चंद्रभान पाटील यांच्या मालकीच्या गट क्रमांक ३१७ मधील शेतात काढणी करून ठेवलेला हरभऱ्याचा ढिगारा होता. रविवारी (दि. ९ मार्च) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी या ढिगाऱ्याला आग लावली. पहाटेच्या सुमारास ही बाब निदर्शनास आली तेव्हा संपूर्ण ढिगारा जळून खाक झाल्याचे दिसून आले.
या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून दोन एकरातील हरभऱ्याचे उत्पादन पूर्णपणे नष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत ढिगाऱ्याचे मोठे नुकसान झाले होते.
या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून संबंधित अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या घटनेची नोंद घेऊन संबंधित विभागाकडून पंचनामा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.


