
नायगाव : बाळासाहेब पांडे
नायगाव तालुक्यात ६ ऑक्टोबरच्या पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत केले. शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षा पाण्यात गेल्या असून उरलेसुरले सोयाबीन पिक सुद्धा आता मातीमोल झाले आहे. तालुक्यातील कुंटूर, नायगाव, बरबडा आणि नर्षी या चारही मंडळांमध्ये रात्री उशिरापर्यंत धुवांधार पाऊस झाला. मागील दोन महिन्यांपासून सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच, काही दिवसांच्या उघडीनंतर शेतकऱ्यांनी पुन्हा कापणीला सुरुवात केली होती. मात्र या मुसळधार पावसाने शेतात पाणी साचून सोयाबीनच्या शेतांचे तळ्यांमध्ये रूपांतर झाले असून, काढलेले सोयाबीन चिखलात गाडले गेले आहे. तालुक्यात एकूण ७८.५० मिमी पाऊस नोंदवला गेला. यापैकी बरबडा मंडळात ९३.५० मिमी, नायगाव मंडळात ९६.५० मिमी, कुंटूर मंडळात ७५.५० मिमी, तर नर्षी मंडळात ८८ मिमी इतका पाऊस झाला आहे. दरम्यान, देगाव शिवारात अतिवृष्टीमुळे गणेश मल्लू बिस्मिल्ले या मेंढपाळाच्या मेंढ्यांवर नैसर्गिक आपत्तीचा कहर झाला. त्यांच्या पाच मेंढ्यांचा मृत्यू झाला असून पाच ते सहा मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन तहसीलदार आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली. देगाव सज्जाचे तलाठी शिवकुमार मंगनाळे यांनी घटनास्थळी पंचनामा केला, तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब ठाकरे यांनी मृत मेंढ्यांचे पोस्टमॉर्टेम करून अहवाल संबंधित विभागाकडे पाठविला. यापूर्वी ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीतही नायगाव तालुक्यात एका नागरिकाचा बळी गेला होता. सततच्या या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हवालदिल, पशुपालक बेदखल आणि शेतमजूर कामाविना हलाखीत आहेत.सरकारकडून मदतीचा ठोस निर्णय न घेतल्याने नागरिकांमध्ये असंतोष असून प्रश्न उपस्थित केला जात आहे. “शेतकरी आणि पशुपालकांचे हे दु:ख सरकार मायबाप अजून किती दिवस ताटकळत ठेवणार?”

