
जयकुमार अडकिने
माहूर- अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या व ग्राहकांच्या बँक खात्यावरील होल्ड काढून डीबीटी व शासकीय लाभ वितरीत करण्याच्या मागणीसाठी दि. ०३ सप्टेंबर रोजी आखिल भारतीय किसान सभेच्या वतीने माहूर बसस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन प्रशासनातर्फे शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे सुरु असून ८५ टक्के काम झाले असल्याचे सांगितले व शासनाच्या आदेशांनुसार नुकसानभरपाई देण्यात येईल असे आश्वासन दिले. तर अनेक शेतकरी व ग्राहक यांच्या केसीसी तसेच बचत खात्यांवर होल्ड आलेले आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणारे विविध डीबीटी (Direct Benefit Transfer) व इतर शासकीय योजनांचे लाभ संबंधित खातेदारांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. आमच्या शाखेमार्फत ग्राहकाना त्याच्या शासकीय योजनांचे निधी मिळावेत यासाठी आम्ही ते डीबीटी फंड तत्काळ सोडत आहोत तसेच, केसीसी नुतनीकरण व थकबाकी वसुलीसाठी आपली मदत आवश्यक आहे. ज्यांची खाती एनपीए (Non- Performing Asset) मध्ये गेलेली आहेत, त्यांना आम्ही OTS (One Time Settlement) योजनेद्वारे दिलासा देत आहोत यामध्ये 30% ते 60% पर्यंत कर्जमाफी/सवलत देण्यात येत आहे. ग्राहकाने थोडीशी रक्कम भरल्यास त्याचे खाते बंद करून, त्याला नवीन केसीसी कर्ज मिळण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल यामुळे ग्राहकांना दुहेरी फायदा मिळणार आहे. तसेच, ग्राहकांच्या बचत खात्यांवरील होल्ड देखील काढून टाकत आहोत, ज्यामुळे त्यांना शासनाचे लाभ व स्वतची ठेव रक्कम सहज उपलब्ध होईल. असे बँकांच्या वतीने कळविण्यात आल्याने रास्ता रोको आंदोलन थांबविण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राज्य सहसचिव कॉ. शंकर सिडाम, राज्य कमेटी सदस्य कॉ. किशोर पवार, माहूर तालुका उपाध्यक्ष कॉ. परसराम पारडे यांनी केले. यावेळी माकप चे कॉ. राजकुमार पडलवार, शेकडो कार्यकर्त्यांची व शेतकऱ्यांची उपस्थिती होती. या आंदोलनास समनक जनता पार्टीचे डॉ. अर्जुन पवार, वंचित बहुजन आघाडीचे दादाराव गायकवाड यांनी सुद्धा पाठिंबा देऊन सक्रीय सहभाग घेतला होता. पोलीस निरीक्षक गणेश कराड स.पो.नि. शरद घोडके व सहकारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

